नेत्यांसाठी पैजांमधून समर्थक मैदानात

By Admin | Updated: December 21, 2015 00:32 IST2015-12-21T00:22:01+5:302015-12-21T00:32:46+5:30

७४७४ पासून लाखापर्यंत पैज : नवसांसाठी कार्यकर्ते सरसावले

Supporters from the seats for the leaders | नेत्यांसाठी पैजांमधून समर्थक मैदानात

नेत्यांसाठी पैजांमधून समर्थक मैदानात

राजाराम लोंढे -- कोल्हापूर--विधान परिषदेची निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे, तशी निवडणुकीतील रंगत व ईर्षा टोकाला पोहोचली आहे. नेत्यांमध्ये एका-एका मतासाठी संघर्ष सुरू असताना कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता दिसत असून, पैजांच्या माध्यमातून कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. कार्यकर्त्यांकडून एक लाखापर्यंतच्या पैजा लावल्या जात असून, नेत्यांवरील निष्ठेपोटी मैत्री पणाला लागलीआहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी एकत्रित राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अपक्ष म्हणून महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकल्याने पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले. महाडिक यांच्याकडेही काही हुकमाची पाने असल्याशिवाय ते शड्डू ठोकणार नाहीत; त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही उमेदवार तगडे असल्याने एका-एका मतासाठी शेवटपर्यंत झुंजावे लागणार आहे. नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी त्यांच्यापेक्षा कार्यकर्तेच आक्रमक झाले आहेत. कोल्हापूर दक्षिण व उत्तर मतदारसंघांतील दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैजाही रंगू लागल्या आहेत. लाखापर्यंत पैजा लावल्या जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही गटांचे कार्यकर्ते ‘नेत्यासाठी कायपण,’ या भूमिकेत असल्याने गावागावांत ईर्षा टोकाला पोहोचली आहे. खासदार धनंजय महाडिक यांचे कागल तालुक्यातील कार्यकर्ते योगेश गुरव यांनी महादेवराव महाडिक विजयी होणार यासाठी २५ हजारांची पैज लावली. ‘ही पैज कोण स्वीकारणार का?’ असे खुले आव्हान त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिले. गुरव यांच्या पैजेचे आव्हान सतेज पाटील यांचे हलसवडे (ता. करवीर) येथील कार्यकर्ते शेखर पाटील यांनी स्वीकारले. सतेज पाटील विजयी होणार म्हणून शेखर पाटील यांनी गुरव यांच्याबरोबर २५ हजारांची पैज लावली. गुरव व शेखर पाटील यांचे पंचतारांकित वसाहतीमध्ये व्यवसाय आहेत. ते एकमेकांचे मित्र आहेत; पण नेत्यांसाठी त्यांनी मैत्री पणाला लावली आहे. पैजेचे मध्यस्थ म्हणून दोघांचे मित्र असणारे पैलवान अमर पाटील (सिद्धनेर्ली, ता. कागल) यांनी पुढाकार घेतला. दोघांनी प्रत्येकी २५ हजारांप्रमाणे ५० हजार रुपये अमर पाटील यांच्याकडे जमा केले.
खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीचे शहर उपाध्यक्ष रहीम सनदी यांनीही महादेवराव महाडिक विजयी होतील यासाठी ३० हजारांची पैज लावली. त्यानंतर आमदार महादेवराव महाडिक यांच्या गाडीच्या ७४७४ क्रमांकाचे बक्षीस या पैजेत लावले आहे. तीस हजारांच्या पैजा पाचजणांनी, तर ७४७४ रुपयांच्या दहाजणांनी लावल्या आहेत. सोशल मीडियावरून रोज अशा पैजांचे पेव फुटू लागले आहे. विजयाचा लंबक कोणाच्या बाजूने झुकणार याचा अंदाज येत नसल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे.


गणपतीलाही साकडे
आपल्या नेत्याच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी आपापल्या ग्रामदैवतांना साकडे घातले आहे. महादेवराव महाडिक यांचे कट्टर समर्थक स्वप्निल सूर्यवंशी यांनी महाडिक जेवढ्या मतांनी विजयी होतील, तेवढे नारळ पितळी गणपतीला वाहण्याचा नवस केला आहे.

Web Title: Supporters from the seats for the leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.