गुंड तहसीलदारसह समर्थक पसार
By Admin | Updated: May 4, 2015 00:55 IST2015-05-04T00:55:01+5:302015-05-04T00:55:01+5:30
सहाजणांची कारागृहात रवानगी : सर्व आरोपींवर गुन्हा दाखल

गुंड तहसीलदारसह समर्थक पसार
कोल्हापूर : पोलीस रेकॉर्डवरील ‘एसटी’ गँगचा म्होरक्या गुंड स्वप्निल तहसीलदार याच्या वाढदिवसाचा कार्यक्रम उधळून लावताना पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी त्याच्यासह समर्थकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तहसीलदार हा काही साथीदारांसह रात्रीपासून पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील, अशी माहिती पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.
कार्यक्रमाची परवानगी नाकारली असतानाही तहसिलदार याने कार्यक्रम घेण्याचे धाडस केल्याने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी त्याचा कार्यक्रम उधळून लावण्याचे आदेश शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक चौधरी यांना दिले. त्यानुसार चौधरी यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांसह पोलिसांची फौज घेऊन दुपारी चारच्या सुमारास कार्यक्रम उधळून लावला. त्यानंतर तहसीलदार याने रात्री दहाच्या सुमारास मुस्कान लॉन येथे कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला. याठिकाणीही पोलीस येताच त्याच्या समर्थकांनी त्यांच्याशी हुज्जत घातली. यावेळी पोलिसांनी त्याचे समर्थक समीर ऊर्फ सोमनाथ जयवंत ढेरे (२२, रा. राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड), सिद्धाप्पा माळाप्पा करगार (२१, रा. घोरपडे गल्ली, शाहूपुरी), अक्षय दगडू मधाळे (२१, रा. सदरबाजार, विचारेमाळ), मंगेश सुभाष आठवले (१९, रा. मार्केट यार्ड), सचिन सुरेश शिंदे (३०, रा. विक्रमनगर), मनोज धर्मेश माटनावळ (२२, रा. उचगाव, ता. करवीर) यांना अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली. (प्रतिनिधी)