पुरवणी तपास अहवाल २९ रोजी सादर होणारदिनेश
By Admin | Updated: March 23, 2016 00:29 IST2016-03-23T00:21:22+5:302016-03-23T00:29:51+5:30
बारी यांची माहिती : समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर आज निर्णय

पुरवणी तपास अहवाल २९ रोजी सादर होणारदिनेश
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एल. डी. बिले आज, बुधवारी निर्णय देणार आहेत.
पोलिसांचा तपास अद्यापही अपूर्ण असल्याने समीर गायकवाड याचा जामीन फेटाळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, या तपासाचा पुरवणी अहवाल येत्या २९ मार्चला सत्र न्यायालयात सादर केला जाईल, असे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी पत्रकारांशी बोलताना मंगळवारी सांगितले.
पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय, एसआयटी व सीआयडी (कर्नाटक) या तपास यंत्रणांत समन्वय झाल्याने नवे पुरावे पुढे येण्याची शक्यता आहे. दि. २८ मार्चला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत सुनावणी तहकूब ठेवावी, असा विनंती अर्ज सरकार पक्षाने सत्र न्यायालयास सादर केला होता. त्यावर आरोपी समीर गायकवाड याच्याविरोधात दोषारोप निश्चित करण्याची सुनावणी न्यायाधीश बिले यांनी दि. २९ मार्चपर्यंत तहकूब केली. सरकार पक्षाने, ‘तपास सुरू आहे, दोषारोप निश्चित करू नका. तपास पूर्ण होईपर्यंत सुनावणी तहकूब करावी’, अशी विनंती केली आहे. हीच कारणे धरून आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी आरोपीला जामीन मिळावा, यासाठी दुसऱ्यांदा न्यायालयास अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने दि. १४ मार्चला दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून दि. २३ मार्चला जामिनाबाबत अंतिम निर्णय दिला जाईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)
हत्याप्रकरणी अहवालासाठी २0 दिवस
पानसरे हत्येप्रकरणी पुरवणी तपास सुरू आहे, असे सांगितले जात आहे. तपास यंत्रणेने आतापर्यंत काय तपास केला, याबाबतचा अहवाल उच्च न्यायालयास सादर करताना सत्र न्यायालयासही सादर करावा, अशा सूचना न्यायाधीश बिले यांनी अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांना दिल्या होता. हा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने तपास यंत्रणेला २० दिवसांचा कालावधी दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तपास अहवाल सादर करणार काय, अशी विचारणा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी डॉ. बारी यांना केली. त्यावर त्यांनी २९ मार्चच्या सुनावणीस अहवाल सादर केला जाईल, असे सांगितले.