सीपीआरमधील अधिष्ठाता कार्यालय जाणार शेंडा पार्कमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:17+5:302021-01-08T05:15:17+5:30
कोल्हापूर : सीपीआरच्या आवारात असणारे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांचे कार्यालय आता शेंडा पार्कमध्ये हलविण्यात येणार आहे. ...

सीपीआरमधील अधिष्ठाता कार्यालय जाणार शेंडा पार्कमध्ये
कोल्हापूर : सीपीआरच्या आवारात असणारे राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांचे कार्यालय आता शेंडा पार्कमध्ये हलविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर या नव्या कार्यालयाचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
वैद्यकीय महाविद्यालयाचे बहुतांशी कामकाज हे शेंडा पार्कमध्ये येथून होते. मात्र महाविद्यालयाशी संबंधित सर्व कार्यालये ही सीपीआरच्या आवारात आहेत. यामध्ये प्रशासकीय अधिकारी, भांडार, लेखा आणि रोखा शाखा, किरकोळ पुरवठा विभाग, विद्यार्थी विभाग, अधिष्ठाता यांचे स्वीय सहाय्यक आणि अन्य कर्मचारी यांच्या कार्यालयांचा समावेश आहे.
शेंडा पार्क येथे वैद्यकीय महाविद्यालयाची मोठी जागा असून, विविध इमारतीही तेथे तयार आहेत. सीपीआरच्या आवारात एकीकडे रुग्णांवर उपचारासाठी विविध विभाग कार्यरत असताना, अधिष्ठाता कार्यालयाशी संबंधित कामकाजही येथूनच होत असल्याने या ठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेंडा पार्क येथे अधिष्ठाता कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आराखडा तयार केला असून, ती कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या महिन्याभरात हे कार्यालय हलवण्यात येईल.