सुपर पिंक मूनचे होणार आज विलोभनीय दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:24 IST2021-04-27T04:24:39+5:302021-04-27T04:24:39+5:30
कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेची ही पौर्णिमा खगोल अभ्यासकांसाठी विलोभनीय राहणार आहे. आज, २७ एप्रिल रोजी मंगळवारी रात्री वर्षातील पहिला ...

सुपर पिंक मूनचे होणार आज विलोभनीय दर्शन
कोल्हापूर : चैत्र पौर्णिमेची ही पौर्णिमा खगोल अभ्यासकांसाठी विलोभनीय राहणार आहे. आज, २७ एप्रिल रोजी मंगळवारी रात्री वर्षातील पहिला सुपर मून दिसणार असून वातावरण जर ढगाळ नसेल तर याचा आनंद अभ्यासकांना घेता येणार आहे. यावेळी चंद्र नेहमीपेक्षा दहा टक्के मोठा आणि २५ टक्के तेजस्वी दिसेल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रा. अविराज जत्राटकर यांनी दिली आहे.
अवकाशात पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि नंतरचे दोन्ही दिवस पूर्णचंद्र दिसणार आहे. या काळात चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर सर्वात कमी असते; परंतु सध्या ढगाळ वातावरण असल्याने आणि हवामान खात्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्यामुळे खगोल अभ्यासकांना या सुपर पिंक मूनचे दर्शन दुर्लभ आहे. कोरोनाच्या विषाणूचा प्रार्दुभाव आणि लॉकडाऊनमुळे खगोल अभ्यासकांनी कोणतेही कार्यक्रम आयोजित केले नसले तरी अनेक खगोलप्रेमी घरूनच सुपर मूनचा आनंद घेणार आहेत.
वर्षातील हा पहिलाच सुपर मून आहे. या पौर्णिमेच्या चंद्राला पिंक मून म्हणत असले तरी त्याचा रंगाशी काही संबंध नाही. खगोल वैज्ञानिकांनी सुपर मूनसाठी प्रत्येक पौर्णिमेला वेगळा रंग दिला आहे, म्हणून पिंकमून म्हणून याची ओळख निश्चित केली आहे.
दुर्बिणीची गरज नाही
सूर्यास्तानंतर चंद्र पूर्वेकडून उगविताना मोठ्या आकाराचा दिसेल. हा सुपर मून पाहण्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता नाही; परंतु दुर्बिणीला फिल्टर लावून त्यावरील विवर पाहता येतील. याशिवाय डीसीएलआर कॅमेऱ्यानेही त्याची छायाचित्रे टिपता येतील. अर्थात कोल्हापूरकरांचे नशीब जोरावर असेल तर हे विलोभनीय दृश्य अनुभवायला मिळणार आहे. यावेळेस चंद्र आकाराने मोठा आणि खूप तेजस्वी दिसणार असल्याने या खगोलीय घटनेचा अभ्यासकांनी आनंद घ्यावा.
------------------------------------------------------------------
संग्रहित छायाचित्र : 26042021-Kol-pink-moon
(बातमीदार : संदीप आडनाईक)