शिराळ्याच्या ‘चिन्मय’ची आकाशाला गवसणी!

By Admin | Updated: December 14, 2014 23:58 IST2014-12-14T22:37:30+5:302014-12-14T23:58:06+5:30

वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड : देशात सातवा क्रमांक, चौदाव्या प्रयत्नात यश

Sunlight 'Chinmaya' sky-sky! | शिराळ्याच्या ‘चिन्मय’ची आकाशाला गवसणी!

शिराळ्याच्या ‘चिन्मय’ची आकाशाला गवसणी!

विकास शहा- शिराळा - प्रयत्नांती परमेश्वर, अर्थात प्रयत्न केल्यावर काहीही अवघड नसते, ही उक्ती शिराळ्याच्या सुपुत्राने भारतीय हवाई दलात वैमानिकपदी निवड होण्यासाठी अथक् परिश्रम घेऊन सार्थ करून दाखविली. चिन्मय श्रीनिवास खुर्द असे या तरु णाचे नाव. देशातील ११ जणांची वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. चिन्मयने यामध्ये सातवे स्थान प्राप्त केले. विशेष म्हणजे यासाठी त्याने तेरावेळा प्रयत्न केले होते. अखेरीस चौदाव्यावेळी त्याच्या प्रयत्नाला यश आले.
अवघ्या २२ व्या वर्षी एअरफोर्स अ‍ॅकॅडमी, हैदराबाद येथे १९७ च्या वैमानिक (पायलट) या दीड वर्षाच्या उड्डाण प्रशिक्षणासाठी त्याची निवड झाली आहे.
खुर्द कुटुंबियांपैकी पांडुरंग तुकाराम खुर्द, गोपाळ तुकाराम खुर्द हे दोघे भाऊ निवृत्त मेजर होते. त्यांचा वारसा घेऊन चिन्मयने अपयशाला सामोरे जाण्याचा धडा आजोबांकडूनच घेतला. शिराळा येथे चिन्मयचा जन्म झाला. चिन्मयचे दहावीपर्यंतचे शिक्षण शिराळ्याच्या विद्याप्रबोधिनी प्रशालेत मराठी माध्यमातून पूर्ण केले. त्याचे वडील श्रीनिवास हे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून, तर आई स्वाती या गृहिणी. शिराळा शिंपी समाजाचे अध्यक्ष विलास खुर्द हे त्याचे काका, तर धाकटा भाऊ दहावीत शिकत आहे.
चिन्मयने दहावीत शिकत असताना नॅशनल डिफेन्स अ‍ॅकॅडमी (एनडीए) मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. बारावीनंतर २०१० मध्ये त्याची एनडीएच्या हवाई दलासाठी निवड झाली. त्यावेळी गुणवत्ता यादीत तो ६२६ व्या स्थानी होता. मात्र ४५० विद्यार्थ्यांची निवड केल्यामुळे चिन्मयची संधी हुकली. बारावीनंतर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. तिथे एनसीसीच्या हवाई दल शाखेत प्रवेश घेऊन ते प्रशिक्षण पूर्ण केले.
बी.एस्सी.च्या तिसऱ्या वर्षांपासून त्याने पुन्हा सैन्यदल अधिकारी पदाच्या परीक्षा देण्यास सुरूवात केली. तब्बल बारावेळा लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊनही तो मुलाखतीत अपयशी ठरला. त्याची जपान सरकारकडून जपानमध्येच व्यवस्थापकीय शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. परंतु जपानला न जाता त्याने फे ब्रुवारीमध्ये पुन्हा कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेसची लेखी परीक्षा दिली. यावेळी त्याची मुलाखतीसाठी निवड झाली.
मुलाखतीवेळी हवाई दलाच्या वैमानिक पदासाठी तू तेरावेळा नापास झाला आहेस, आम्हाला वाटते तू या क्षेत्रासाठी पात्र उमेदवार नाहीस. तुझं याबद्दल मत काय? असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला. त्यावेळी चिन्मयने, ‘प्रत्येक अपयशानंतर मी माझी चूक सुधारतो आहे. गरज पडली तर १५ व्या वेळेसही मी मुलाखतीच्या प्रक्रियेस सामोरे जाईन’, असे सडेतोड उत्तर दिले आणि त्याने या मुलाखतीत यश खेचून आणले. ध्येयवेड्या चिन्मयने शिराळा तालुक्याचे नाव उंचावलेच, तसेच युवकांना एक आदर्शही घालून दिला आहे.


लहानपणापासून हवाई दलात लढाऊ वैमानिक होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजपर्यंतचा प्रत्येक क्षण मी फक्त तोच विचार करत आलोय. अपयशाच्या काळात मी माझे ध्येय डोळ्यासमोरून हटू दिले नाही. प्रशिक्षण पूर्ण करून हवाई दलात लढाऊ वैमानिक व्हायला आवडेल.
- चिन्मय खुर्द

Web Title: Sunlight 'Chinmaya' sky-sky!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.