सुळे - आकुर्डे धरणाची दुरावस्था, वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:19+5:302021-08-20T04:30:19+5:30
धामणी खोरा परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी व धामणी नदीवर सुळे -आकुर्डे धरणाचे सुमारे पन्नास वर्षापूर्वी बांधकाम झाले आहे. या धरणामुळे ...

सुळे - आकुर्डे धरणाची दुरावस्था, वाहतूक बंद
धामणी खोरा परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी व धामणी नदीवर सुळे -आकुर्डे धरणाचे सुमारे पन्नास वर्षापूर्वी बांधकाम झाले आहे. या धरणामुळे परिसरातील सुमारे ४oगावांतील लोकांची वाहतुकीची समस्या दूर झाली. मध्यवर्ती ठिकाणी धरण उभा झाल्याने हे धरण म्हणजे लोकांचा राज्यमार्गच बनला आहे, पण गेली तीन -चार वर्षांपासून या धरणाची मोठी दुरवस्था होऊ लागली आहे. एकूण पंधरा दगडी पिलरपैकी चार पिलरचे बांधकाम मोठया प्रमाणात ढाळसलेले आहेत, तसेच नऊ पिलरही कमकुवत झालेले आहेत. सध्या या धरणाचा आणखी एक पिलर सुमारे ८०टक्के ढासळलेला आहे. या धरणाच्या पिलरची अवस्था पाहता धरणावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे असे झाले आहे.
मोठी दुघर्टना होऊ नये म्हणून या धरणावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. पावसाळ्यात पुरामुळे वाहून आलेली लाकडे, झाडेझुडपे हे धरणाच्या पिलरला अडकतात . त्यामुळे पाण्याच्या दाबामुळे पिलरला धोका पोहोचतो, पण पावसाळा संपल्यानंतर संबधित विभाग धरणाची कोणती दुरवस्था झाली आहे का नाही यांची पाहणी करून दुरुस्ती केली जात नसल्यामुळे या धरणाची दुरवस्था झाली असल्याचे बोलले जात आहे.
डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, कुंभी -कासारी, दत्त दालमिया या साखर कारखान्यांना या धरणावरून ऊस वाहतूक होते. हा मार्ग जवळचा व सोईस्कर असल्याने सर्व वाहनधारकांची या धरणावरून मोठी रहदारी असते. सध्या पिलरची मोठी दुरवस्था झाल्याने वाहनधारकांसमोर वाहतुकीचा मोठा प्रश्न समोर उभा राहिला आहे. संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी हे मोठी दुर्घटना घडल्यावरच लक्ष देणार का, असा सवाल धामणी परिसरातून होत आहे.
चौकट : सुळे -आकुर्डे बंधारा धामणीवासीयांसाठी महत्त्वाचा आहे . पाटबंधारे विभागाने या धरणाच्या पिलरची डागडुजी न करता नव्याने पिलरचे मजबूत बांधकाम करावे तरच या परिसरातील वाहतुकीचा मार्ग सुरळीत व सुरक्षित चालू राहील.
-सुदर्शन पाटील, मल्हारपेठ ग्रा.पं. सदस्य.
फोटो ओळ : सुळे -आकुर्डे या धरणाचा दगडी पिलर ढासळला असून यामुळे धरणावरील वाहतूक बंद करावी लागली आहे.