सुकन्येच्या पावलांनी घराघरांत आली समृद्धी...
By Admin | Updated: February 26, 2015 00:11 IST2015-02-25T23:56:33+5:302015-02-26T00:11:22+5:30
पोस्टाची सुकन्या समृद्धी योजना : महिन्यात १३६१ खातेधारक

सुकन्येच्या पावलांनी घराघरांत आली समृद्धी...
इंदूमती गणेश - कोल्हापूर - मुलगी म्हणजे माहेर आणि सासर या दोन्ही कुटुंबांचा वंशाचा दिवा. ‘मुलीच्या पावलांनी घरी लक्ष्मी आली...!’ असे म्हटले जाते; पण ही म्हण वास्तवात उतरवीत केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत पोस्टाद्वारे सुरू करण्यात आलेल्या ‘सुकन्या समृद्धी खाते’ या योजनेला कोल्हापूर जिल्ह्णातील नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत महिन्याभरात जिल्ह्णातून १३६१ खाती उघडण्यात आली आहेत. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा... मुलगी हे परक्याचे धन आणि जबाबदाऱ्या या गैरसमजांमुळे भारतात स्त्री-भ्रूण हत्या केली जाते. आता जनजागृतीचे प्रमाण वाढले असले तरी स्त्रीजन्माचे स्वागत व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाने पोस्ट व आणि राष्ट्रीयीकत बँका यांच्यामार्फत ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना १ फेब्रुवारीपासून सुरू केली आहे. महिन्याभरातच या योजनेला नागरिकांतून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूर शहर, जिल्ह्णात पोस्टाची तीन मुख्य कार्यालये व ९६ उपकार्यालये आहेत. या सर्व पोस्ट कार्यालयांत मिळून आजवर १,३६१ खाती उघडण्यात आली आहेत. शिवाय रोज तितक्याच संख्येने अर्ज नेणे, ते भरून आणून देणे ही प्रक्रिया सुरू आहे. पोस्ट कार्यालयातील सर्व कर्मचारी सध्या या योजनेच्या अधिक प्रसिद्धीच्या आणि नागरिकांना माहिती देण्याच्या कामांत गुंतले आहेत.
रक्कम काढण्याचा
अधिकार मुलीलाच...
मात्र, शासनाने या योजनेत वारसदाराची तरतूद केलेली नाही. म्हणजे सदर योजनेत पालकांनी फक्त हप्ते भरत राहायचे. नियमानुसार मुदत संपल्यानंतर किंवा मध्येच रक्कम काढायची असेल तर तो अधिकार फक्त मुलीला आहे, पालकांना नाही.
मुलींचे शिक्षण आणि विवाह या दोन्हीसाठी आर्थिक तरतुदीची चिंता पालकांना असते. त्यामुळे केंद्र शासनाने महिला सबलीकरण आणि मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे या उद्देशाने ‘सुकन्या समृद्धी योजना’ जाहीर केली आहे. तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत असून, अधिकाधिक पालकांनी त्याचा लाभ घ्यावा.
- आय. एन. नाईकवडी
(प्रधान डाकपाल, कोल्हापूर हेड पोस्ट आॅफिस)
काय आहे ही योजना...
१या योजनेत नवजात शिशू ते १० वर्षांपर्यंतच्या मुलींचे खाते उघडता येते.
२कमीत कमी १ हजार रुपये भरून व एका वर्षात जास्तीत जास्त दीड लाखापर्यंतची रक्कम या योजनेत भरता येते. व्याज ९.१ टक्के या दराने मिळेल.
३खाते उघडण्यासाठी आई किंवा वडिलांचे पॅन कार्ड, आधार कार्ड व मुलीचा जन्मदाखल्याची झेरॉक्स आवश्यक.
४मुलगी १८ वर्षांची झाल्यावर जमा रकमेच्या ५० टक्के रक्कम व मुलगी २१ वर्षांची झाल्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येते. योजनेत २१ वर्षे रक्कम गुंतविली तर एक हजाराच्या हप्त्यावर ६ लाख, ७ हजार १४९ इतकी रक्कम मिळेल.
५महिन्यातून किंवा वर्षातून कितीही वेळा रक्कम भरता येते; मात्र खाते खंडित झाले तर दंड भरावा लागेल.
६ही योजना आयकर कलम ८० सी अंतर्गत सवलतीस पात्र आहे.