माजी फुटबॉलपटूची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: July 21, 2014 00:47 IST2014-07-21T00:47:36+5:302014-07-21T00:47:52+5:30
उत्कृष्ट गोलकीपर

माजी फुटबॉलपटूची गळफास घेऊन आत्महत्या
कोल्हापूर : कोल्हापुरातील माजी फुटबॉल खेळाडूने राहत्या घरी बेडरुममध्ये सिलींग फॅनला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज रविवार सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. संग्राम निवास लव्हटे (वय ३५, रा. माळी कॉलनी, वर्षानगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांनी सांगितले, संग्राम लव्हटे याचे आई-वडील, भाऊ व वहिणी दोन दिवसांपूर्वी गावी गेले होते. तो एकटाच घरी होता. काल रात्री जेवण करून तो झोपी गेला. आज सकाळी त्याचे वडील घरी आले, तर दरवाजा बंद होता. त्यांनी त्याला हाक मारण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यानंतर त्यांनी दरवाजा मोडून आतमध्ये प्रवेश केला असता मुलगा संग्रामने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर राजारामपुरी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरला पाठवून दिला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक अमृत देशमुख करीत आहेत. (प्रतिनिधी) संग्राम हा गेली दहा वर्षे शिवाजी तरुण व खंडोबा तालीमचा फुटबॉल खेळाडू होता. उत्कृष्ट गोलकीपर म्हणून त्याची ओळख होती. त्याचा कपीलतिर्थ मार्केट येथे प्लास्टिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्याचबरोबर त्याने नुकतीच नवीन रिक्षा घेतली आहे. त्याचा परवानाही त्याला मिळाला आहे. अखेरची भेट... आयुष्य संपविण्याचा निर्णय संग्रामने घेतल्यानंतर त्याने रिक्षामधून काल शनिवारी रात्री आपल्या मित्रांची भेट घेतली. यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद भरून आला होता. रात्री भेट घेऊन गेलेल्या मित्राच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याच्या मित्रांना मानसिक धक्काच बसला. त्यांनी त्याच्या घराकडे धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.