लोगो : खुशाली नव्हे खंडणी
शरद यादव
कोल्हापूर : जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे, याचवेळी मजूर कमी आले आहेत. त्यामुळे यावर्षी ऊस संपणे अवघड आहे, अशी भीती शेतकऱ्यांना दाखवून ट्रॅक्टर मालक व ऊसतोडणी मजूर एकराला ५ हजार रूपये घेऊन ऊस तोडत असल्याचे चित्र आहे. साखर कारखान्यांची क्रमपाळी पत्रक अनेक ठिकाणी हद्दपार झाली असून, चिटबॉय केवळ नावालाच आहे. ट्रॅक्टर मालक ठरविणार तोच ऊस तोडला जात असल्याने व याकडे साखर कारखानदारांनी साेयीस्कर डोळेझाक केल्याने शेतकरी पुरता हबकला आहे.
कोल्हापूर जिल्हा हा साखर पट्ट्यातील सर्वात सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. पूर्वी जिल्ह्यात सांगली, सातारा, सोलापूर, बीड येथून ऊसतोड मजूर येत होते. आता मात्र मोठ्या प्रमाणात जळगाव जिल्ह्यातून मजूर येऊ लागले आहेत. या अगोदर साखर कारखान्याच्या चिटबाॅय क्रमपाळी पत्रकानुसार ऊसाला तोड आल्याची चिठ्ठी मुकादमाकडे देत असे. ही चिठ्ठी घेऊन तो मुकादम संबंधित शेतकऱ्यांच्या घरी जात असे. त्यानंतर एकही रूपया न देता ऊसाची तोड सुरू केली जात होती. आता मात्र ही व्यवस्थाच मोडून काढल्याचे दिसून येत आहे. आता ट्रॅक्टर मालक शेतकऱ्याबरोबर पैशाचा व्यवहार ठरवणार व जो योग्य वाटेल तेथे कोयता घालणार, असा गोरखधंदा सुरू झाला आहे. यासाठी एकराला ५ ते ६ हजार रूपये दर पडला आहे. यातील काही रक्कम तोडकऱ्यांना तर थाेडा वाटा चिटबॉयलाही मिळत असल्याने तोही ट्रॅक्टर मालक सांगेल, त्या शेतकऱ्याची पावती करून देत आहे. कसाही आणा, आम्हाला ऊस मिळण्याशी मतलब, असा पवित्रा साखर कारखानदारांनी घेतल्याने हा शेतकरी लुटीचा ‘पॅटर्न’ गावागावात रूढ होऊ लागला आहे.
..........
चालकाला एन्ट्री, हा काय प्रकार
या लुटीत ट्रॅक्टर चालकही मागे पडलेला नाही. प्रत्येक खेपेला ३०० रूपये एन्ट्री तो शेतकऱ्यांकडून हट्टाने वसूल करत आहे. वास्तविक ट्रॅक्टर मालकाला वाहतुकीचे पैसे मिळत असतील तर चालकाचा पगार, जेवण हे सर्व त्यांनी देणे अपेक्षित असताना शेतकऱ्यांच्या असाह्यतेचा फायदा घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रकार सुरू आहे.
............
कोट....
ऊस हा काही नाशवंत पदार्थ नाही. ऊस महिनाभर जरी वेळाने तुटला तरी वजनात काही फरक पडत नाही. मात्र, असे असताना शेतकरीच ट्रॅक्टर मालकांच्या मागे ऊस तोडणीसाठी लागल्यामुळे हा खंडणीचा काळ सोकावला आहे. पूर्वीप्रमाणे क्रमपाळी पत्रकानुसारच ऊसतोडी व्हाव्यात, अशी आमची मागणी आहे व त्याचा आम्ही पाठपुरावा साखर कारखानदार व प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे केला आहे.
शिवाजी माने
अध्यक्ष, जय शिवराय किसान संघटना
...........
ऊस ताेडणीसाठी मिळणारी मजुरी (प्रतिटन)
बैलगाडीने ऊसतोडणी : २३७ रूपये
ट्रॅक्टरने ऊसतोडणी : २७३ रूपये
मशीनने तोडणी : ३८० रूपये
मजुरांच्या मजुरीवर मुकादमाला मिळणारे कमिशन : १९ टक्के
ऊस वाहतुकीसाठी टनाला मिळणारी वाहतूक :२५० रूपये (१५ किलाेमीटरच्या आत)
उद्याच्या अंकात : एकाच ट्रॅक्टरचे ३ कारखान्यांकडे करार, शेतकरी बेकार