उसाच्या ‘एफआरपी’त वाढ व्हायला हवी

By Admin | Updated: July 6, 2016 01:07 IST2016-07-06T01:06:35+5:302016-07-06T01:07:53+5:30

विजय शर्मा यांचे मत : केंद्रीय कृषिमूल्य आयोगाची ‘शाहू’ कारखान्यावर बैठक

The sugarcane 'FRP' should be increased | उसाच्या ‘एफआरपी’त वाढ व्हायला हवी

उसाच्या ‘एफआरपी’त वाढ व्हायला हवी

कोल्हापूर : उसाचा वाढता उत्पादन खर्च पाहता ‘एफआरपी’च्या रकमेत वाढ झाली पाहिजे, असे स्पष्ट मत व्यक्त करीत साखर कारखान्यांना चांगला ‘एफआरपी’ देण्यासाठी साखरेचे दर स्थिर राहिले पाहिजेत, यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा यांनी दिली.
केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या सदस्यांची मंगळवारी कागल येथील छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर बैठक झाली. दोन तास चाललेल्या या बैठकीत शर्मा यांनी कारखान्यांचे प्रतिनिधी, ऊस उत्पादक यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली.
कृषिमूल्य आयोगाने ‘एफआरपी’ निश्चित करताना त्यावेळचे बाजारातील साखरेचे दर पाहणे गरजेचे असून, दर कोसळले तर एफआरपी देणे अडचणीचे होते. यासाठी साखरेचे दर स्थिर राहण्याबाबत सरकारच्या पातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. सध्याचा एकरी उत्पादन खर्च पाहता, केंद्र सरकारने निश्चित केलेली ‘एफआरपी’ परवडत नाही. रासायनिक खते, पाणी, वीज बिलात वारेमाप वाढ झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.
कारखानदार व ऊस उत्पादकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर विजय शर्मा म्हणाले, वाढीव उत्पादन खर्च
विचारात घेता, ‘एफआरपी’मध्ये वाढ झाली पाहिजे. यासाठी साखरेचे दर स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करू. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आधुनिक व शास्त्रीय शेतीकडे वळून उत्पादन खर्चात कपात करण्यासाठी ठिबक सिंचन यासारखे उपक्रम राबविले पाहिजे.शाहू कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय औताडे यांनी प्रास्ताविक केले. आयोगाचे सदस्य कैवल्य प्रधान, सहसंचालक साखर (विकास) पांडुरंग शेळके, निरंजन देसाई, राजाराम कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, पी. जी. मेढे, के. पी. सिंग, एम. व्ही. पाटील, शैल्य हेगाना, मृत्युंजय शिंदे, के. बी. पाटील, रणजित पाटील, युवराज पसारे, स्वप्निल शहा, अनिल कुरणे, अनिल कांडेकर, दीपक खांडेकर, जितेंद्र शेंडके, दत्तात्रय पाटील उपस्थित होते.
--------------
फोटो ओळी- केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या सदस्यांची मंगळवारी कागल येथील शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर बैठक झाली. यामध्ये आयोगाचे अध्यक्ष विजय शर्मा यांनी कारखान्याचे प्रतिनिधी व ऊस उत्पादकांची मते जाणून घेतली. यावेळी समरजितसिंह घाटगे, पी. जी. मेढे, विजय औताडे, आदी उपस्थित होते.


साखरेची दुहेरी किंमत संकल्पना योग्य
साखरेच्या एकूण उत्पादनापैकी ३० टक्केच घरगुती वापर होतो. उर्वरित ७० टक्के उद्योगासाठी होतो. यासाठी साखरेची दुहेरी किंमत केल्याने ‘एफआरपी’ देणे सहज शक्य होईल. कारखानदारांनी मांडलेल्या प्रस्तावाचे स्वागत करीत ही संकल्पना योग्य फोरमपुढे मांडली जाईल; पण तिची अंमलबजावणी कठीण असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

ऊसदर स्थिरता निधीचा मार्ग
सरकारच्या पातळीवर ऊसदर स्थिरता निधी स्थापन करणे गरजेचे आहे. साखरेचे दर घसरल्यानंतर ‘एफआरपी’ देण्यासाठी जो तुटवडा भासतो, तो देण्यासाठी यातून कारखान्यांना मदत होईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

Web Title: The sugarcane 'FRP' should be increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.