ऊस गळीत हंगाम १५ आॅक्टोबरपासून
By Admin | Updated: August 17, 2014 01:04 IST2014-08-17T00:54:45+5:302014-08-17T01:04:36+5:30
हर्षवर्धन पाटील : हजार मेगावॅट सहवीज प्रकल्पाला नव्याने मान्यता

ऊस गळीत हंगाम १५ आॅक्टोबरपासून
कोल्हापूर : राज्यातील ऊस गळीत हंगाम १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतली असल्याची माहिती पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यंदा नव्याने एक हजार मेगावॅट सहवीज प्रकल्पाला मान्यता देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
मंत्रिमंडळ बैठकीत साखर कारखाने १५ आॅक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे आदेश साखर आयुक्त कार्यालयास दिले आहेत. पुढील हंगाम ८० ते ८२ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल, असा प्राथमिक अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे साखर उत्पादन घटण्याचीही शक्यता आहे. सरकारने यापूर्वी २१०० मेगावॅटच्या सहवीज प्रकल्पांना परवानगी दिली होती. त्यापैकी १५०० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आता नव्याने एक हजार मेगावॅट सहवीज प्रकल्पांना मान्यता दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्हा बॅँकामार्फत दिल्या जाणाऱ्या पीक कर्जाच्या व्याजाला सवलत देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी २३१ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले. त्यातील १३१ कोटी रुपये हे व्याजातील सवलतीसाठी देण्यात येतील. उर्वरित रक्कम ही सेवा सोसायट्या आणि गट सचिवांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने, मनपा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)