ऊसदर मंडळ अस्तित्वात
By Admin | Updated: November 10, 2014 23:59 IST2014-11-10T23:43:36+5:302014-11-10T23:59:19+5:30
अध्यादेश जारी : संजयकाका, जाचक यांच्या नावांना कात्री

ऊसदर मंडळ अस्तित्वात
विश्वास पाटील- कोल्हापूर- महाराष्ट्र शासनाने आज, सोमवारीच काढलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील ऊसदर नियंत्रण मंडळातून विशेष निमंत्रित म्हणून सांगलीचे खासदार संजयकाका पाटील व पृथ्वीराज जाचक यांच्या नावांना कात्री लावली आहे.
आजच त्यांची या मंडळावर विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती झाल्याचे जाहीर झाले होते; परंतु शासनाने त्यासंबंधीचा आदेश काढताना मात्र मंडळामध्ये त्यांच्या नावांचा समावेश झालेला नाही. त्यामुळे भाजपचे सरकार त्यांच्याच खासदारांचे नाव विसरले की, त्यांच्या नावाला कुणी कात्री लावली, अशी चर्चा आता सुरू होणार आहे.
राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने महाराष्ट्र (कारखान्यांना पुरविण्यात आलेल्या) उसाच्या दराचे विनियमन अधिनियम २०१३ मधील कलम तीन मधील तरतुदीनुसार मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन केलेल्या ऊस नियंत्रण मंडळामध्ये अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासंबंधीचा आदेश (शासन निर्णय क्रमांक : ससाका-२०१४/ प्र.क्र.११४/२५-स ता. १० नोव्हेंबर २०१४ ) आजच या विभागाचे सहसचिव कविता पारकर यांनी काढला आहे. शासनाच्या संकेतस्थळावरही तो उपलब्ध आहे; परंतु त्यामध्ये खासदार पाटील व पृथ्वीराज जाचक यांची नावे नाहीत. आज दुपारीच खासदार राजू शेट्टी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या मंडळाबाबत चर्चा झाली होती व तातडीने त्याचा आदेश काढला जाण्याची मागणी शेट्टी यांनी केली होती. त्यानुसार आदेश तर निघाला; परंतु मुख्यमंत्र्यांच्या चर्चेवेळी या मंडळावर खासदार संजयकाका पाटील व स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते पृथ्वीराज जाचक यांचा विशेष निमंत्रित म्हणून समावेश करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिली होती. परंतु, प्रत्यक्षात ही संमती आदेशामध्ये उमटलेली नाही.
शेतकऱ्यांचे प्रतिनिधी
खासदार राजू शेट्टी (अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिरोळ जि. कोल्हापूर)
रघुनाथदादा पाटील (अध्यक्ष, शेतकरी संघटना साखराळे, ता. वाळवा)
रामनाथ शिवनाथ डोंगरे (रा. निमज, ता. संगमनेर, जि. अहमदनगर)
पांडुरंग साहेबराव आव्हाड (रा.आव्हाड-शिरपुरा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद)
विठ्ठल नामदेव पवार (प्रसिद्धी प्रमुख व संघटना सरचिटणीस शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, पुणे)