साखरेच्या माळांनी पाडव्याची चाहूल
By Admin | Updated: March 16, 2015 00:04 IST2015-03-15T23:58:50+5:302015-03-16T00:04:20+5:30
आठवडा बाजार : मैद्याची मोठी आवक; उन्हाळ्यामुळे लिंबू, काकडीला मागणी वाढली

साखरेच्या माळांनी पाडव्याची चाहूल
कोल्हापूर : गुढीपाडवा या सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील बाजारात साखरेच्या माळा दाखल झाल्या आहेत. उन्हाळ्याची सुरुवात झाल्याने लिंबू, काकडीच्या ग्राहकांकडून मागणीत वाढ झाली आहे. एका लिंबूचा दर पाच रुपयांवर गेला आहे. एकंदरीत, बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी रेलचेल सुरू होती.गुढीपाडवा अवघा पाच दिवसांवर आला आहे. या सणासाठी लागणाऱ्या साखरेच्या माळा, मैदा, फुले यांची मागणी वाढू लागली आहे. रविवारी शहरातील बाजारात विशेषत: ग्रामीण भागातून आलेल्या ग्राहकांकडून साखरेच्या माळांची मागणी होत होती. पिवळ्या, भगव्या, पांढऱ्या, गुलाबी अशा चार विविध रंगांत असलेल्या या एका माळेचा दर दहा रुपयांपासून ५० रुपयांपर्यंत होता. त्याचबरोबर वाटाण्याच्या शेंगा, गाजरांच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. वाटाणा प्रतिकिलो ८० रुपये, तर गाजर ४० रुपये झाले आहे. उन्हाळ्यामुळे लिंबू व काकडीला मागणी वाढूनही दरात वाढ झाली आहे. गत आठवड्यात दहा रुपयांना मिळणारे चार लिंबू आता २० रुपये झाले आहेत. लिंबवाचा दर सरासरी पाच रुपये झाला आहे. काकडीचा प्रतिकिलो ६० रुपये झाला आहे. तब्बल २० रुपयांची वाढ झाली आहे. पन्हे, लोणचे, गुळांब्यासाठी असलेली कच्ची कैरी (एक नग) दहा रुपये होती. गुढीपाडव्याला पोळ्याला लागणाऱ्या मैद्याला मागणी आहे. दरम्यान, गहू, डाळ, साखर, तांदूळ, ड्रायफु्रट, तेलाचे दर ‘जैसे थे’ आहेत.दुसरीकडे, मोसंबी, संत्री, सफरचंद (इंडियन, फॉरिन व डेलिसन) आंबा हापूसच्या दरात वाढ झाली आहे. आंबा हापूस पेटीचा दर ३२०० रुपये झाला आहे. तो गत आठवड्यात १८०० रुपये होता. यामध्ये तब्बल १४०० रुपये वाढ झाली. तसेच गूळरव्यामध्ये किंचितशी वाढ झाली आहे. शंभर किलोंचा दर ३५५० वरून ३६०० रुपये झाला आहे.
यात झाली घसरण...
कांदा, बटाटा, वांगी, उसावरील शेंग, फ्लॉवर, कोबी, कोथिंबीर, मेथी यामध्ये घसरण झाली आहे. बटाटा ३५ रुपयांवरून २० रुपये प्रतिकिलो, वांगी ३० वरून २० रुपये, उसावरील शेंग ४० वरून २० रुपये आहे. कोथिंबीर, मेथी व पोकळा पाच रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
गुढीपाडव्याला पाच दिवस राहिले असले तरी आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागात साखरेच्या माळांना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या घाऊक बाजारात साखरेच्या माळा ११० रुपये किलो आहेत.
-शिरीष सासने, विक्रेता, लक्ष्मीपुरी बाजार.