ऊसतोड मजुरांची दिवाळी यंदाही आपल्या गावातच
By Admin | Updated: October 21, 2014 23:41 IST2014-10-21T21:09:05+5:302014-10-21T23:41:10+5:30
१ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद

ऊसतोड मजुरांची दिवाळी यंदाही आपल्या गावातच
संदीप बावचे - जयसिंगपूर -साखर कारखान्यांच्या धुराडी १५ नोव्हेंबरनंतरच पेटणार असल्यामुळे यंदाही ऊसतोड मजुरांची दिवाळी आपापल्या गावांतच साजरी होणार आहे. १ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत आहे. अन्य शेतकरी संघटना व शिवसेना यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून राहिले आहे. त्यातच ऊस मजुरांच्या टोळ्या आणण्याबाबत अजूनही वाहनधारकांना कोणतेही आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याही नजरा धुराडी पेटण्याकडे लागल्या आहेत.
ऊसदराच्या प्रश्नावरून गतवर्षी साखर कारखानदारी अडचणीत आली होती. शेतकरी संघटना व शिवसेनेने उसाच्या पहिल्या उचलीसाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ऊस वाहतूकदार दुहेरी चिंतेत होते. आंदोलनापासून वाहन सुरक्षित ठेवणे, ऊसतोड मजुरांच्या टोळ्या कामापासून किती दिवस थांबणार, अशी चिंता वाहनधारकांना होती. मात्र, ‘थांबा आणि पहा’ अशी भूमिका कारखानदारांनी ठेवल्यामुळे वाहनधारकांनी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या आणल्या नव्हत्या. यामुळे दरवर्षी ऊस हंगामाच्या ठिकाणी दिवाळी सण साजरा करणाऱ्या ऊसतोडणी मजुरांनी आपल्या गावातच हा सण साजरा केला.
यंदा १५ नोव्हेंबरनंतरच साखर कारखान्यांच्या धुराडी पेटणार अशीच चिन्हे आहेत. १ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूर येथे ऊस परिषद होत आहे. या ऊस परिषदेत पहिल्या उचलीबाबत कोणता निर्णय होणार, आंदोलनाची दिशा काय ठरणार, हाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. त्यातच शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना, रघुनाथदादा पाटील प्रणीत शेतकरी संघटना आणि शिवसेना या चारही संघटना आंदोलनाचा पवित्रा कितपत घेतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे. ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळणार का? हादेखील विषय महत्त्वाचा आहे. या सर्व चक्रात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रकमालक चिंतेत आहेत.