चार वर्षे ऊस पुरवठा न केल्यास साखर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:21 IST2021-01-04T04:21:17+5:302021-01-04T04:21:17+5:30
संकेश्वर : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी सलग चार वर्षे कारखान्यास उसाचा पुरवठा न केल्यास शेअर्सवर मिळणारी सभासदांची साखर ...

चार वर्षे ऊस पुरवठा न केल्यास साखर बंद
संकेश्वर : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी सलग चार वर्षे कारखान्यास उसाचा पुरवठा न केल्यास शेअर्सवर मिळणारी सभासदांची साखर बंद केली जाईल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती यांनी दिली.
कारखाना कार्यस्थळावर आयोजित ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कोरोनामुळे ही सभा ऑनलाईन झाली.
कत्ती म्हणाले, चालूवर्षी नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. गाळप क्षमता पाचवरून आठ हजारांपर्यंत वाढविली आहे. कांही सभासद ऊस इतरत्र गाळपास पाठवीत आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने गाळप करण्यात अडचणी येत आहेत.
सध्या ४ लाख ८४ हजार मेट्रिक टन गाळप झाले असून, ५ लाख १९ हजार क्विंटल उत्पादन झाले आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी पिकविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे पाठवून सहकार्य करावे. डॉ. अशोक पाटील यांनी अहवाल वाचन केले. एस. आर. कळीनाईक यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब आरबोळे यांनी आभार मानले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.