साखर सहसंचालकांच्या दारात शेतकरी संघटनेतर्फे काळी गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:51 IST2016-04-09T00:37:26+5:302016-04-09T00:51:32+5:30
आता साखरेचे दर ३६०० रुपयांपर्यंत जाऊनही उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे नाव साखर कारखानदार काढत नाहीत.

साखर सहसंचालकांच्या दारात शेतकरी संघटनेतर्फे काळी गुढी
कोल्हापूर : यंदाचा गळीत हंगाम संपत आला तरी एफआरपीमधील उर्वरित २० टक्के रक्कम कारखान्यांनी दिलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नसल्याबद्दल शुक्रवारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसंचालकांच्या दारात काळी गुढी उभा करून निषेध नोंदविला. ऊसदरावरून पेच निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व खासदार राजू शेट्टी यांनी तडजोड करत ८०:२० चा फॉर्म्युला आणला. आता साखरेचे दर ३६०० रुपयांपर्यंत जाऊनही उर्वरित २० टक्के रक्कम देण्याचे नाव साखर कारखानदार काढत नाहीत. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला असताना त्याला उसाचे पैसे मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. एकीकडे दुष्काळ व दुसरीकडे कारखानदार उसाचे पैसे देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मात्र, सहकारमंत्री काहीच बोलत नाहीत. ज्यांनी तडजोड केली तेही मूग गिळून गप्प आहेत. याचा निषेध करण्यासाठी गुढीपाडव्यादिवशी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या दारात काळी गुढी उभी केल्याचे युवा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. माणिक शिंदे यांनी सांगितले. या गुढीला साखरेच्या माळेऐवजी कारखान्यांनी एफआरपीबाबत दिलेल्या हमीपत्रांची माळ केली असून आठ दिवसांत एफआरपीमधील २० टक्के दिले नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा अॅड. शिंदे यांनी दिला.
यावेळी अजित पाटील, महादेव कोल्हे, आदम मुजावर, टी. आर. पाटील, दिलीप माणगावे, मोहन चौगुले, विष्णू सणगर, किसन पाटील, गुणाजी शेलार, बदाम शेलार यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुढी सायंकाळनंतरही उभीच !
सकाळी बांधलेली गुढी सायंकाळी उतरली जाते, पण सहसंचालक कार्यालयाबाहेर बांधलेली गुढी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उतरलेली नाही. कार्यालयाला तीन दिवस सुटी असल्याने सोमवारी अधिकाऱ्यांनीच गुढी उतरावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे.