रामचंद्र कुडाळकर - तळवडे --आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांनाच प्रगती करण्याची व त्यातही पुढे जाण्याची घाई लागली आहे. पण एकेकाळी आपल्या जगण्याचा अविभाज्य घटक असलेल्या आणि काही प्रमाणात उदरनिर्वाहाचेही साधन ठरलेल्या पाळीव प्राण्यांचे मात्र या युगात पाहिजे तसे पालन होताना दिसत नाही. म्हणूनच आज गावोगावी भटकी कुत्री, मांजर, गायी, म्हशी असे प्राणी आढळतात. याच प्राण्यांच्या पालनपोषणाचे आवाहन करण्यासाठी जम्मू-काश्मीरहून भारतभ्रमण करणाऱ्या एका व्यक्तीचे कार्य सावंतवाडी तालुक्यातील तळवडे पंचक्रोशीत कौतुकास्पद ठरले. भूतदयेचा संदेश देणाऱ्या या अवलियाला पाहून ग्रामस्थ काही काळ भावनिक झाले. या ४३ वर्षीय व्यक्तीचे नाव सुफी अल्ताफ भाट असे असून, आतापर्यंत त्याने सात हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला आहे. २६ सप्टेंबर २०१० पासून त्याने जम्मू-काश्मीर ते मुंबई, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली व गोवापर्यंतचा प्रवास केला. आता तो मुंबईकडे मार्गक्रमण करीत आहे. वाटेत भेटेल त्याला शांतीमय जीवनाचा व सहनशीलतेचा संदेश देत विनम्रपणे जाणारा हा अवलिया भूतदयेसाठी आदर्शवत ठरला आहे. गावोगावी फिरणारी भटकी कुत्री, जनावरे यांच्या नसबंदीअभावी वाढणारी संख्या समाजास घातक ठरतेच, पण त्याचबरोबर त्या प्राणिमात्रांचे पालनपोषणही अडचणीचे ठरते. प्लास्टिकचा कचरा रस्तोरस्ती पडत आहे. भटकणारे प्राणी हा कचरा खाऊन अनेक आजारांना बळी पडतात. प्राणी लहान मुलांवर हल्ला करतात. त्यामुळे रॅबीज लस द्यावी लागते. या प्राण्यांवर योग्य व आवश्यक उपचार केला जात नसल्याने साहजिकच प्राण्यांचे हे रोग वातावरणाद्वारे मानवाच्या आरोग्यालाही घातक होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने भटकणाऱ्या प्राण्यांना आपलेसे करून त्यांचे पालनपोषण केले तर भूतदयाही होईलच, पण त्याचबरोबर मोठे सामाजिक कामही त्यांच्या हातून घडेल, असे भावनिक विवेचन सुफी भाट ग्रामस्थांशी करतो. यामुळे ग्रामस्थही भावनिक होऊन धीरगंभीर होतात. सुुफीकडे त्याच्या भटकंतीवेळी सापडलेली दोन कुत्री व एक मांजर आहे. त्यांची तो नित्यनियमाने सेवा करतो. खिशात आवश्यक तेवढा पैसा आणि पाठीशी हवे तेवढे पाठबळ नसताना सुफीची ही वाट म्हणजे समाजाला भूतदयेचा आदर्शवत मार्ग दर्शविणारी आहे. गोवा राज्याची सफर केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्ह्यातील मळगाव येथील महामार्गावर पायी जाणाऱ्या सुफी भाट याच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. त्यावेळी त्याने जगाच्या नकाशावरील भारतातील पर्यटनाचे सर्वोत्तम ठिकाण म्हणून गौरविले जाणारे गोवा राज्य हे आपल्या भटकंतीच्या मुख्य उद्देशाला फायदेशीर ठरणार असल्याने आपण इकडे आल्याचे सांगितले.
भूतदयेसाठी भारत भ्रमण करणारा सुफी
By admin | Updated: July 12, 2015 21:23 IST