नाईकनवरेेंच्या मुलासह कामगारांना बेदम मारहाण
By Admin | Updated: August 19, 2014 23:41 IST2014-08-19T23:18:33+5:302014-08-19T23:41:56+5:30
पाच तरुणांना अटक : दारू पिण्यास बसू दिले नाही म्हणून कृ त्य

नाईकनवरेेंच्या मुलासह कामगारांना बेदम मारहाण
कोल्हापूर : लिशां हॉटेल परिसरातील इमारतीच्या बांधकामाच्या मोकळ्या जागेत दारू पिण्यासाठी बसू दिले नाही, या रागापोटी आज, मंगळवार दुपारी दीडच्या सुमारास पंधरा ते वीस तरुणांच्या गटाने माजी महापौर प्रतिभा प्रकाश नाईकनवरे यांच्या मुलासह पाच कामगारांना लोखंडी गजाने बेदम मारहाण केली, यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी पाच संशयित आरोपींना अटक केली.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी स्वप्निल प्रकाश नाईकनवरे (वय २८, रा. शाहूपुरी) यांचे लिशां हॉटेल परिसरात साई कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. आज दुपारी दीडच्या सुमारास कावळा नाका येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात लग्नसमारंभ होता. येथील पंधरा ते वीस तरुण दारूच्या बाटल्या विकत घेऊन पिण्यासाठी नाईकनवरे यांच्या साईटवर आले. या ठिकाणी कामगार बसाप्पा सुतार याने दारू पिण्यास बसू नका, असे सांगून हटकण्याचा प्रयत्न केला. याचा राग मनात धरून त्यांनी लोखंडी गजाने स्वप्निल याच्यासह कामगार बसाप्पा सुतार, रमणबाला, परिमल बिसवास, संपत रॉय यांना बेदम मारहाण केली. त्यामध्ये हे सर्वजण गंभीर जखमी झाले. ही मारहाण सुरूअसतानाच स्वप्निल याने शाहूपुरी पोलिसांना मोबाईलवरून या घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी आल्याची चाहूल लागताच काही तरुण पळून गेले; तर पाचजणांना अटक केली.
दरम्यान, नगरसेवक नाईकनवरे यांच्या मुलाला मारहाण झाल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी सीपीआर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गर्दी केली. (प्रतिनिधी)