सुदेश ठाकूरची विकास पाटीलवर गुणांवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:01 IST2021-01-13T05:01:09+5:302021-01-13T05:01:09+5:30
शित्तूर-वारुण : तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथे दत्तसेवा विद्यालयाच्या प्रांगणात कुस्ती हेच जीवन या महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील ...

सुदेश ठाकूरची विकास पाटीलवर गुणांवर मात
शित्तूर-वारुण : तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथे दत्तसेवा विद्यालयाच्या प्रांगणात कुस्ती हेच जीवन या महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या अधिकृत ऑनलाईन कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत विकास पाटील याच्यावर सुदेश ठाकूर यांनी गुणांवर विजय मिळविला. आखाडा पूजन कुस्ती हेच जीवनचे राज्यअध्यक्ष रामदास देसाई, मनोज मस्के, अशोक सावंत, शरद पाटील, हंबीरराव पाटील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाच्या उदय खांडेकर विरुद्ध अजित पाटील यांच्या लढतीत अजित पाटील विजयी झाला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत अमर पाटील याने प्रदीप ठाकूरवर छडी टांग डावाने अकराव्या मिनिटाला विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत संदीप बंडगर याने तात्या इंगळे यास तेराव्या मिनिटाला चितपट केले. पाचव्या क्रमांकाच्या लढतीत सौरभ सव्वाशे याने विनायक जोग याच्यावर ढाक डावाने विजय मिळविला.
मैदानातील इतर विजय मल्ल असे, ओंकार जाधव, विकी थोरात, विकास मोरबाळे, सूरज पाटील, विवेक लाड, नेताजी भोसले, आदित्य नायकवडी, अनिरुद्ध शिंदे, नयन माईंगडे, साहिल पाटील, यशराज खबाले, प्रतीक शिंदे, राजवर्धन पाटील, संकेत नेर्लेकर, ओंकार पाटील, अजिंक्य गायकवाड, विनय पाटील यांनी विजय मिळविला. एक ते पाचपर्यंतच्या सर्व विजयी मल्लांना प्रताप कदम यांच्यामार्फत कायमस्वरूपी चषक देण्यात आले. पंच म्हणून बाजीराव पाटील, विश्वास माईंगडे, बाजीराव कलंत्रे, रंगराव पाटील, पांडुरंग पाटील यांनी काम पाहिले. समालोचन सुरेश जाधव चिंचोलीकर यांनी केले.
फोटो:
तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावताना आनंदराव माईंगडे, बंडा मामा रेठरेकर, कुस्ती हेच जीवनचे राज्याध्यक्ष रामदास देसाई व सर्व पदाधिकारी. (छाया : सतीश नागरे)