शहरातील हॉटेल्सची अचानक तपासणी

By Admin | Updated: August 30, 2015 00:25 IST2015-08-30T00:25:55+5:302015-08-30T00:25:55+5:30

दोन हॉटेलचा परवाना निलंबीत : आयुक्तांकडून तपासणी करण्याची पहिलीच वेळ

Sudden examination of hotels in the city | शहरातील हॉटेल्सची अचानक तपासणी

शहरातील हॉटेल्सची अचानक तपासणी

कोल्हापूर : महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शनिवारी सायंकाळी शहरातील चार नामांकीत हॉटेल्सवर अधिकाऱ्यांच्या फौजफाट्यासह जाऊन तपासणी केली. त्यानंतर त्यांनी दोन हॉटेलचे परवाने निलंबीत केले. आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन हॉटेल्सची तपासणी करण्याची ही पहिलीच वेळ असून या तपासणीमागे काही वेगळे पैलू आहेत का अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे.
आयुक्त पी. शिवशंकर यांनी अतिरीक्त आयुक्त नितीन देसाई, ताराराणी चौक विभागीय कार्यालयाकडील उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, घरफाळा विभागाचे अधिक्षक दिवाकर कारंडे,मुख्य अग्निशम अधिकारी रणजीत चिले यांच्यासह दहा ते पंधरा अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन ही तपासणी केली. आयुक्तांनी प्रथम मार्केटयार्ड परिसरातील हॉटेल सोनी पॅलेस गाठले. या हॉटेलच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन माहिती घेतली. त्यानंतर हॉटेल ओरिएंटल क्राऊन, हॉटेल तृष्णा आणि हॉटले रजत यांचीही तपासणी केली. सर्व ठिकाणी हॉटेल व्यवस्थापनाने बांधकाम परवाना घेतला आहे का, परवान्याप्रमाणे बांधकाम केले आहे का, बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र घेतली आहेत का, नियमाप्रमाणे घरफाळा आकारणी झाली आहे का, त्यांनी तो भरला आहे का, व्यवसाय परवाना घेतला आहे का, अग्नीशमन विभागाने दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी केली आहे का आदी विविध बाबींच्या अनुषंगाने आयुक्तांनी तपासणी केली. दुपारी चार वाजल्यापासून सुरु असलेली ही तपासणी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरु होती. या पाहणीत काही ठिकाणी अनियमितपणा दिसून आलेला आहे. बांधकाम अतिरीक्त झालेले आहे तर पार्कींगच्या जागा अडविलेल्या आहेत असेही स्पष्ट झाले आहे. हॉटेल सोनी पॅलेस व हॉटेल तृष्णा यांनी वातानुकुलीत खोल्यांसाठी परवाना घेतला नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांचे परवाने निलंबीत करण्यात आले.
चारच हॉटेल्स तपासणी का ?
आयुक्त शिवशंकर यांनी शनिवारी केवळ चारच हॉटेलची तपासणी केली. वास्तविक शहरात अनेक ठिकाणी मोठ्या हॉटेलच्या व्यवस्थापनांनी महापालिकेचे नियम धाब्यावर बसविले असल्याच्या तक्रारी नगरसेवक करत असतात पण त्यांची दखल घेतली जात नाही. नगरसेवक भुपाल शेटे यांनी एका यात्री निवास हॉटेल व कार्यालयावर घरफाळाच आकारला जात नसल्याची तक्रार केल्यावर दखल घेतली आणि ४८ लाखांची वसुलीची नोटीस द्यावी लागली. शेटे यांनी ही बाब उजेडात आणली नसती तर आणखी किती वर्षे या हॉटलेला घरफाळा आकारला गेला नसता हे समजलेही नसते. आयुक्त शिवशंकर यांनी हात घातलाच आहे तर एका कडेने सर्वच हॉटेलची तपाणी करावी अशी मागणी नगरसेवकांतून होत आहे.
आणखी पंधरा दिवसांनी कारवाई
शहरातील सर्व व्यावसायिकांना अशाच प्रकारच्या तपासणीचा व कारवाईचा इशारा महानगरपालिकेतर्फे देण्यात आला आहे. ज्या व्यवसायांमध्ये अनियमितता आहेत त्यांचे १० दिवसात नियमतीकरण करुन घेण्यात यावे अन्यथा १५ दिवसांनी पुढील कारवाई करण्यात येईल असा इशारा पालिकेने दिला आहे.

Web Title: Sudden examination of hotels in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.