मायबापांच्या पाठबळानेच यशस्वी
By Admin | Updated: July 1, 2015 00:41 IST2015-07-01T00:41:47+5:302015-07-01T00:41:47+5:30
‘धागे जन्मांतरीचे’ : आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुजा पाटील, स्नेहांकिता वरुटेंनी उलगडले यशाचे गुपित

मायबापांच्या पाठबळानेच यशस्वी
कोल्हापूर : लहानपणापासूनच खेळाचे असलेले वेड आणि आई-वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दार कामगिरी केली़ मुलांची मक्तेदारी असलेले खेळ आम्ही निवडले; पण सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर यशस्वी झालो, या शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अनुजा पाटील आणि वेटलिफ्टर स्नेहांकिता वरुटे यांनी आपल्या वडिलांना मंगळवारी सलाम केला़ निमित्त होते ‘लोकमत सखी मंच’तर्फे ‘फादर्स डे’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘धागे जन्मांतरीचे’ या कार्यक्रमाचे़ ़़ ‘वामाज सिल्क अॅँड सारीज’ या कार्यक्रमाचे प्रायोजक होते़
शाहू स्मारक भवनात झालेल्या या कार्यक्रमात पिता आणि मुलगी यांच्या नात्यांमधील अनेक पदर परस्परांनी उलगडले़ अनुजा पाटील म्हणाल्या, वडील क्रिकेटपटू होते़ आठव्या वर्षापासून त्यांचे सामने पाहायला जात असल्यामुळे क्रिकेटची आवड निर्माण झाली़ वडिलांनीच बॅट धरायला शिकवली़ त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत धडक मारली़
स्नेहांकिता वरुटे म्हणाल्या, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या खेळांमध्ये मी करिअर करावे, अशी माझ्या आईची इच्छा होती़ त्यामुळे क्रीडा क्षेत्रात आॅफ बिट करिअर निवडण्याचा निर्णय घेतला़ प्रयाग चिखली या माझ्या गावामध्ये पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या व्यक्तींचा सत्कार लहानपणी पाहिला़ तो पाहून घरी गेल्यानंतर माझाही सत्कार होण्यासाठी मला काय करावे लागेल, या प्रश्नावर ‘त्याला खूप कष्ट करावे लागतात,’ हा आईने दिलेला सल्ला मी आचरणात आणला़
आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने हिचे वडील अनिल माने म्हणाले, वयाच्या तिसऱ्या वर्षापासून रेश्माला कुस्तीचे धडे देण्यास प्रारंभ केला़ कोल्हापुरात घरोघरी कुस्ती माहीत आहे़ याचा लाभ आॅलिम्पिकमध्ये उठविण्यासाठी मी कष्ट घेतले़
मुलींसाठी अपारंपरिक क्रीडाक्षेत्र निवडल्यानंतर आजूबाजूचे लोक बोलायचे; पण त्याचा विचार केला नाही़ या क्षेत्रात त्यांचा कल आहे, हे लक्षात आल्यानंतर प्रोत्साहन देत गेलो़ त्यांना मिळत असलेल्या यशामुळे प्रचंड समाधान लाभले, असे मत अरुण पाटील आणि आणि बाबासाहेब वरुटे यांनी व्यक्त केले़
सुरुवातीला अरुण पाटील, बाबासाहेब वरुटे आणि अनिल माने यांचा कोल्हापुरी लहरी फेटे बांधून गौरव करण्यात आला़ यानंतर गरीब विणकराच्या जीवनावरील ‘कांजीवरम्’ हा प्रियदर्शन दिग्दर्शित, राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘सखीं’ना दाखविण्यात आला़ कार्यक्रमाच्या शेवटी ‘सखीं’साठी लकी ड्रॉ काढण्यात आला़ यावेळी ‘वामाज सिल्क अॅँड सारीज’तर्फे लकी ड्रॉमधील भाग्यवान तीन सखींना साड्या देण्यात आल्या़ (प्रतिनिधी)