‘पीओपी’ मूर्ती विरघळवून यशस्वी विसर्जन
By Admin | Updated: September 7, 2016 00:59 IST2016-09-07T00:50:59+5:302016-09-07T00:59:09+5:30
पंचगंगा नदीघाटावर प्रयोग : मूर्ती विसर्जनाच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा

‘पीओपी’ मूर्ती विरघळवून यशस्वी विसर्जन
कोल्हापूर : प्लास्टर आॅफ पॅरिसची (पीओपी) मूर्ती काही तासांत विरघळविण्याचा यशस्वी प्रयोग मंगळवारी पंचगंगा नदीघाटावर करण्यात आला. या प्रयोगाला नागरिकांची साथ मिळाली तर प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तिविसर्जनावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. यावेळी महापालिका उपायुक्त विजय खोराटे उपस्थित होते.
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या गणेशमूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे विसर्जनानंतर दहा दिवस मनोभावे पूजलेल्या गणेशमूर्तींची होणारी अवस्था भक्तांसाठी क्लेशकारक असते. शिवाय जलाशयांचे प्रदूषण होते, ही गोष्ट वेगळीच. शाडू मिळत नाही आणि प्लास्टर आॅफ पॅरिसला पर्याय नाही, या पेचातून नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने संशोधन करून हा मार्ग काढला आहे.
मूर्तीच्या वजनाइतकाच अमोनियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा विसर्जन करावयाच्या भांड्यातील पाण्यात मिसळला की त्यात विसर्जन केलेली मूर्ती २४ ते ४८ तासांत विरघळते. हे पाणी मूर्तीवर अभिषेकाप्रमाणे अखंडपणे सोडत राहिले तर आठ तासांत मूर्ती विरघळते. हाच प्रयोग पंचगंगा नदीघाटावर करण्यात आला. रेफ्रिजरेशन अॅँड एअर कंडिशनिंग सर्व्हिसिंग सेक्टर सोसायटीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रमोद पुंगावकर, शैलेश टांकसाळकर, राजेंद्र इंगवले, अतुल इंगळे यांनी काचेच्या पेटीत प्लास्टर आॅफ पॅरिसची एक मूर्ती ठेवली. त्यावर अखंडपणे पाण्याची धार सोडली. पंधराव्या मिनिटांनंतर मूर्तीचे बाह्य पापुद्रे निघण्यास सुरुवात झाली.
शनिवारी घरगुती गौरी-गणपतीचे विसर्जन आहे. त्या पार्श्वभूमीवर केलेल्या या प्रयोगाला नागरिकांची साथ मिळाली तर जलप्रदूषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य काही अंशी तरी कमी होणार आहे. यावेळी निशिकांत भिंगार्डे, उज्ज्वल नागेशकर, कौशल शिर्के, चंद्रकांत परुळेकर, मनीषा पोटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप
पर्यावरणपूरक विसर्जन : नदीघाटावर ८० गणेशमूर्ती केल्या दान
कोल्हापूर : गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघा एक दिवस झाला असला, तरी ज्यांच्या घरी केवळ दीड दिवस गणेशमूर्ती ठेवण्याची पद्धत आहे, अशा कुटुंबांनी जड अंत:करणाने बाप्पांना निरोप दिला. पर्यावरणप्रेमी आणि महापालिकेने दिलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या हाकेला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वत:हून मूर्तींच्या विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जित केल्या.
पंचगंगा नदीघाटावर मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत ८० हून अधिक घरगुती मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन झाले होते. बहुतांश कुटुंबांमध्ये गौरी-गणपतीचे एकत्रित विसर्जन केले जाते. काही कुटुंबांत अनंत चतुर्दशीला, तर काही कुटुंबांमध्ये, विशेषत: ब्राह्मण कुटुंबांत दीड दिवसातच गणेशमूर्ती विसर्जित केली जाते. प्रत्येक कुटुंबातील परंपरेनुसार हा विधी पार पाडला जातो. पंचगंगा घाट येथे पंचगंगा घाट संवर्धन समितीतर्फे मूर्तीच्या शेवटच्या आरतीसाठी टेबलची व्यवस्था व पर्यावरणपूरक विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली होती.
नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येथे मूर्ती विसर्जित केल्या. काही भक्त मूर्ती तीन वेळा पंचगंगा नदीपात्रात बुडवून ती सामाजिक कार्यकर्त्यांकडे देत होते. येथे ‘अवनि’ संस्थेच्या वतीने निर्माल्य व मूर्तींचे संकलन केले जात होते.
अमोनियम बायकार्बोनेट हे फूड ग्रेन द्रावण आहे. हे पाणी मूर्तीवर अखंडपणे सोडले तर मूर्ती आठ तासांत विरघळते. मूर्ती फक्त या पाण्यात ठेवली तर ती विरघळायला ४८ तास लागतात. हे विरघळलेले प्लास्टर आॅफ पॅरिस खत म्हणून तसेच अन्य उद्योजकांनाही वापरता येते.
- प्रमोद पुंगावकर
यंदाच्या वर्षी गणेशमूर्ती विसर्जनावेळी महापालिकेच्यावतीने अमोनियम बायकार्बोनेटचे पाणी असलेले एक विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती या कुंडात विसर्जित कराव्यात. त्याला प्रतिसाद आला तर पुढच्या वर्षी नागरिकांनी मूर्ती घरीच विसर्जित करावी. - विजय खोराटे, उपायुक्त
अन्य ठिकाणी गैरसोय
मंगळवारी फक्त पंचगंगा नदीघाट येथेच विसर्जन कुंडांची सोय करण्यात आली होती.
रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, राजाराम बंधारा अशा ठिकाणी ही सोय नसल्याने इच्छा असूनही काही नागरिकांना मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करता आले नाही.