बेपत्ता शाळकरी मुलास शोधण्यात आठ तासांनी यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:21 IST2021-01-08T05:21:23+5:302021-01-08T05:21:23+5:30
पट्टणकोडोलीमधील विनायक बोरगावे हा गावातीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकत आहे. त्याला सायकलिंग तसेच पाळीव श्वानांची आवड आहे. ...

बेपत्ता शाळकरी मुलास शोधण्यात आठ तासांनी यश
पट्टणकोडोलीमधील विनायक बोरगावे हा गावातीलच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सातवीत शिकत आहे. त्याला सायकलिंग तसेच पाळीव श्वानांची आवड आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे सायकलिंगसाठी घराबाहेर पडला. मात्र, दुपारचे बारा वाजले तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मित्र परिवार तसेच इतरांकडे चौकशी केली. मात्र त्याची काहीच माहिती लागत नसल्याने नातेवाईक व परिसरात घबराट पसरली. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनीही गांभीर्याने दखल घेत तपासाची सूत्रे तातडीने हलवली. सीसीटीव्हीचे ठिकठिकाणचे फुटेज तपासून पोलिसांसह स्थानिक तरुणांची स्वतंत्र पथके तयार करून विनायकचा शोध सुरू केला. दरम्यान, विनायक पुणे-बेंगलोर महामार्गावरील कागल येथील लक्ष्मी टेकडी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, उपनिरीक्षक विजय मस्कर, पल्लवी यादव व कर्मचारी, पालक आदींनी तेथे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले.