उपनगराध्यक्ष कक्ष कुलूपबंद
By Admin | Updated: July 17, 2017 00:11 IST2017-07-17T00:11:49+5:302017-07-17T00:11:49+5:30
उपनगराध्यक्ष कक्ष कुलूपबंद

उपनगराध्यक्ष कक्ष कुलूपबंद
गणपती कोळी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : येथील पालिकेतील उपनगराध्यक्ष कक्ष उपनगराध्यक्ष जवाहर पाटील आल्यानंतरच तेवढेच उघडले जाते. ते कक्ष सोडून गेले की, पुन्हा कुलूपबंद केले जाते. कक्ष हा पदाधिकाऱ्यांचा सन्मानाचा असलातरी शहरवासीयांच्या सेवेसाठीसुद्धा आहे. दिवसभर नगराध्यक्षांसह सर्व समित्या सभापती व विरोधी पक्षाच्या कक्ष जनतेच्या सोयीसाठी उघडा असतो. मात्र, उपनगराध्यक्ष कक्ष कुलूपबंद ठेवत असल्याने नगरसेवकांसह शहरवासीयांतून नाराजी व्यक्त होत असून, कक्ष बंद ठेवण्याचे नेमके गमक काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालिकेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्वच समिती सभापती व विरोधी पक्षाचा कक्ष आहे. पदाधिकाऱ्यांना कामकाजासाठी सोयीचा व्हावा. भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते, नागरिकांना बसण्याची तसेच त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना कक्ष देण्यात आला आहे.
सध्याचे उपनगराध्यक्ष कक्ष हा संस्थानकालीन इमारतीत आहे. जुने व शास्त्रोक्त पद्धतीने बांधकाम यामुळे हा कक्ष नैसर्गिकरीत्या वातानुकूलीत आहे. शिवाय हा कक्ष आल्हाददायक वाटत असल्याने प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या कक्षाची ओढ असते. तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शहरवासीय कामानिमित्त पालिकेत आले असता या कक्षाचा तात्पुरता आसरा घेतात. त्यामुळे या कक्षाला विशेष महत्त्व आहे.
हा कक्ष आपल्याला मिळावा, यासाठी पदाधिकारीही आग्रही असतात. या कक्षाच्या मागणीसाठी विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांत काही महिन्यांपूर्वी भर पालिका सभेतच राडा झाला होता. मात्र, नगराध्यक्ष जयराम पाटील व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी शिष्टाई करून हा कक्ष उपनगराध्यक्षांना देऊन समेट घडविला होता.
नगराध्यक्षांसह सर्वच समिती सभापतींचे व विरोधी पक्षाचे कक्ष येणारे कार्यकर्ते, प्रतिष्ठित मंडळी, शहरवासीयांच्या सोयीसाठी
उघडे असते. मात्र, उपनगराध्यक्ष
कक्ष उपनगराध्यक्ष पाटील येताच उघडले जाते व त्यांनी काम आटोपून निघून गेले की, पुन्हा कुलूपबंद
केले जाते. पदाधिकाऱ्यांच्या हक्काचा कक्ष असला तरी नागरिकांच्या सोयीसाठीही आहे. असे असताना
या कक्षाला कुलूपबंद ठेवण्याचे कारणच काय? असा सवाल
काही नगरसेवकांसह शहरवासीयांना पडला आहे. त्यामुळे या
प्रकाराची शहरातून उलट-सुलट चर्चा सुरू असून, नाराजीचा सूरही उमटत आहे.