‘संजीवन पब्लिक’ ठरला सुब्रतो चषकाचा मानकरी
By Admin | Updated: August 1, 2015 00:49 IST2015-08-01T00:40:59+5:302015-08-01T00:49:57+5:30
फुटबॉल : मुलींमध्ये देवाळे हायस्कूल विजेते

‘संजीवन पब्लिक’ ठरला सुब्रतो चषकाचा मानकरी
कोल्हापूर : संजीवन पब्लिक स्कूलने संजीवन विद्यालयाचा अंतिम सामन्यात ३-० असा पराभव करीत, तर मुलींमध्ये देवाळे हायस्कूलने काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरीचा टायब्रेकरवर ३-२ असा पराभव करीत सतरा वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. कोल्हापुरातील रेसकोर्स येथील विभागीय क्रीडासंकुलात शुक्रवारी सकाळी संजीवन पब्लिक स्कूल विरुद्ध संजीवन विद्यालय यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात प्रारंभापासून संजीवन पब्लिकच्या खेळाडूंनी वर्चस्व राखले. संजीवन पब्लिककडून सिद्धार्थ पाटील, सौरव जाधव, रणधीर काळे यांनी आक्रमक खेळ केला व प्रत्येकी एक गोल करीत ३-० अशी आघाडी घेतली. सामन्यात बरोबरी करण्याचे संजीवन विद्यालयाने आटोकाट प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. अखेर हा सामना संजीवन पब्लिक स्कूलने ३-० असा जिंकत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.दुसऱ्या सत्रात सतरा वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत देवाळे हायस्कूल, देवाळे विरुद्ध काडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरी यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ करीत सामन्यात रंगत आणली होती. देवाळेकडून प्रतीक्षा गराडे हिने गोल नोंदविला; तर काही मिनिटांच्या अंतराने काडसिद्धेश्वरच्या प्रतीक्षा मिठारी हिने गोल नोंदवीत सामन्यात बरोबरी केली. त्यामुळे निकाल टायब्रेकरवर झाला. यामध्ये देवाळे हायस्कूलने ३-२ अशी बाजी मारली. बक्षीस वितरण आशिष मांडवकर यांच्या हस्ते झाले. क्रीडाधिकारी उदय पवार यावेळी उपस्थित होते.