सुभाषनगर-यल्लमा मंदिर रस्त्याची चाळण
By Admin | Updated: April 10, 2015 23:46 IST2015-04-10T22:14:45+5:302015-04-10T23:46:22+5:30
सुभाषनगर चौक : वीस वर्षे रस्ता डांबराच्या प्रतीक्षेत; तुंबलेल्या गटारी अन् डासांचे साम्राज्य, कचरा रस्त्यांवर --लोकमत आपल्या दारी

सुभाषनगर-यल्लमा मंदिर रस्त्याची चाळण
प्रवीण देसाई / सचिन भोसले - कोल्हापूर
गेल्या वीस वर्षांपासून रस्त्यावर डांबरच पडले नसल्याने सुभाषनगर ते यल्लमा मंदिर या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही याबाबत कोणतीच प्रगती झाली नसल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याशिवाय अरुंद गटारींमुळे रस्त्यावर येणारे दुर्गंधीयुक्त घाण पाणी, महापालिका कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तुंबलेल्या गटारी या डासांचे आगर बनल्या आहेत. अशा नानाविध समस्यांचा पाढा सुभाषनगर परिसरातील नागरिकांनी शुक्रवारी ‘लोकमत आपल्या दारी’ या उपक्रमात वाचला.सुभाषनगर परिसर म्हणजे कष्टकरी व मध्यमवर्गीय लोकांची वस्ती. या परिसरात वर्षानगर, संत रोहिदास कॉलनी, मनीषानगर, माळी कॉलनी, सिरत मोहल्ला, आदी भाग येतो. येथील समस्याही शहरातील इतर परिसरांप्रमाणेच आहेत. खराब रस्ते ही येथील प्रमुख समस्या आहे. सुभाषनगर ते यल्लमा मंदिर हा डांबरी रस्ता १९९५ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर या वर्दळीच्या रस्त्यावर डांबरीकरण झाले नसल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्त्याची चाळण झाल्याने रात्रीच्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. याबाबत सनदशीर मार्गाने महापालिकेकडे पाठपुरावा करूनही काहीच उपयोग झालेला दिसत नाही. येथून प्रवास म्हणजे कंबर ढिली होण्याची लक्षणे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरातील कॉलनीअंतर्गत रस्त्यांचीही अशीच अवस्था आहे.
रस्त्याकडेला असणाऱ्या गटारी अरुंद आहेत. यामुळे घाण पाणी रस्त्यावर येऊन डासांचे साम्राज्य वाढले आहे. साहजिकच आरोग्याच्या समस्या पाचवीला पुजल्यासारख्या आहेत. या गटारी कालबाह्य झाल्या असून, बांधीव गटारींची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी गटारींची स्वच्छता करण्यासाठी अमावास्या-पौर्णिमेलाच फिरकत असल्याने त्या नेहमी तुंबलेल्याच असतात. कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी बोलाविल्यानंतरच ते येतात.
परिसरात कचरा उठावाची समस्याही मोठी आहे. कचराकुंड्या नसल्याने कचरा उघड्यावरच टाकला जातो. ड्रेनेजलाईन्स मुख्य लाईनला जोडल्या नसल्याने अस्वच्छ पाणी थेट रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अस्वच्छता व दुर्गंधीचा सामना करावा लागतो. परिसरातील विजेचे काही खांब नुसते नावालाच असल्याने विजेअभावी रात्री अपघातांचे प्रकार घडतात.
पिण्याचे पाणी फक्त दिसण्यापुरतेच येते. जुन्या पाईपलाईन न बदलल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.
वीस वर्षे डांबरीकरण नाही
यल्लमा मंदिराकडून सुभाषनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे जवाहरनगर मुख्य चौकापासून गेली वीस वर्षे डांबरीकरणच केलेले नाही. या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे आहेत. त्यामुळे वाहन चालविणे सोडाच, धड चालताही येत नाही. त्यामुळे हा रस्ता महापालिकेने त्वरित करावा. - सचिन चौगुले
गटारी वेळेवर साफ करा
सुभाषनगरातील अंतर्गत गटारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून वेळोवेळी साफ न केल्याने डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठाही अपुरा होत आहे. तरी महापालिकेने त्वरित लक्ष घालून आमचे प्रश्न सोडवावेत.
- राजन कांबळे
शंभर फुटी रस्ता करा
शास्त्रीनगरकडून येणारा रस्ता शंभर फुटी आहे. मात्र, तो अजूनही पूर्ण केलेला नाही. त्यामुळे वाढत्या वाहनांमुळे रहदारी वाढली आहे. तसेच परिसरातील कचरा उठाव वेळेत होत नाही. झाडू कामगार वेळेवर येत नाहीत. ड्रेनेजलाईनचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे या समस्या महापालिकेने त्वरित लक्ष देऊन सोडवाव्यात.
- उत्तम बामणे
पथदिवे बसवा
रात्रीच्या वेळी खांबांवरील पथदिवे लागत नसल्याने वाहनधारकांबरोबरच चालत जाणाऱ्या नागरिकांनाही अंधारातून मार्ग काढावा लागतो. विशेषत: मुख्य रस्त्यावरील मंदिराजवळ हा प्रश्न अधिक तीव्रतेने जाणवतो. गटारीही वेळोवेळी साफ केल्या जात नाहीत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.
- संजय पोवार
नगरसेवकांचा सतत संपर्क
सुभाषनगर भागाच्या नगरसेवकांच्या कानी आपल्या विविध समस्या घातल्यानंतर ते स्वत: समस्यांची पाहणी करण्यासाठी तत्काळ येतात. सुभाषनगर येथील विद्यालयाचे ‘संत रोहिदास विद्यामंदिर’ असे नामकरण केले आहे. भागात पाणीपुरवठा सुरळीत आहे.
- सुरेश यादव
मेन रोड करा
बिजली चौकातून सुभाषनगरकडे येणारा मुख्य रस्ता गेली कित्येक वर्षे महापालिकेने केलेला नाही. यासाठी नगरसेवक आग्रही राहत नाहीत. परिसरात कचरा उठाव वेळेत होत नाही. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठा झाला आहे. डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करावी.
- भोलेनाथ पोळ
जुनी गटारे बदला
सुभाषनगर परिसरातील जुनी गटारे नगरसेवकांनी निधी उपलब्ध करून न दिल्याने गेली कित्येक वर्षे बदललेली नाहीत. या समस्येकडे महापालिकेने त्वरित लक्ष द्यावे. - राजेंद्र बामणेकर
कचरा उठाव वेळेत करा
परिसरातील कचऱ्याचा वेळेत उठाव केला जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी वाढली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याअगोदर महापालिकेच्या कचरा उठाव करणाऱ्या मुकादमांनी लक्ष द्यावे.
- राजेंद्र डोईफोडे
अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय
सध्या उन्हाळा असल्याने पाणी जादा लागते. मात्र, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तो सुरळीत करावा.
- भारत डोईफोडे
घरकुल योजना करा
सुभाषनगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना शासनाची घरकुल योजना लागू करावी. जेणेकरून परिसराचा विकास होईल.
- रणजित पाटील
सुविधा वेळेवर
सुभाषनगर परिसरात महापालिकेकडून थोड्याच सुविधा वेळेवर मिळत आहेत. त्यामुळे उरलेल्या समस्यांकडे लक्ष देणे जरुरीचे आहे.
- फरिदा जमादार
ड्रेनेजलाईनची गरज
भागात गेले कित्येक वर्षे नवी ड्रेनेजलाईन टाकलेली नाही. त्यामुळे ड्रेनेज वारंवार तुंबण्याची समस्या या भागात आहे. याशिवाय परिसरातील रस्ते गेले कित्येक वर्षे केलेले नाहीत.
- मोहन पोवार