सुभाष रोडवर मृत्यूच्या दुभाजकांवर लावले फलक
By Admin | Updated: July 30, 2014 00:28 IST2014-07-30T00:23:04+5:302014-07-30T00:28:04+5:30
परिसरातील तरुणांचा पुढाकार : उपक्रमाचे पोलिसांकडून स्वागत

सुभाष रोडवर मृत्यूच्या दुभाजकांवर लावले फलक
कोल्हापूर : कोल्हापुरातील फोर्ड कॉर्नर ते उमा चित्र मंदिर चौक रस्त्यावर रिलायन्स मॉलसमोर असलेल्या दुभाजकाला धडकून दीड वर्षात दोघाजणांचा बळी गेला आहे. अशा घटना वारंवार घडू नयेत, यासाठी सामाजिक कार्यकर्ते अमर माने यांनी आज मंगळवारी स्वखर्चातून ‘अपघात क्षेत्र, धोक्याचा इशारा’ या नावाचे फलक लावून जनजागृती केली. त्यांच्या या उपक्रमाचे पोलिसांनी स्वागत केले.
लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर ते उमा चित्रमंदिरकडे जाणाऱ्या सुभाष रोडवर रिलायन्स मॉलसमोर असलेल्या दुभाजक समोरून येणाऱ्या वाहनांचा प्रखर झोत डोळ््यांवर पडला की वाहनचालकांना अजिबात दिसत नाही. त्यामुळे या दुभाजकावर वाहने आदळण्याच्या वारंवार घटना घडतात. त्याबद्दल त्या परिसरातील नागरिकांनी वाहतूक शाखेकडे अनेकदा तक्रारी केल्या परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. अशीच घटना सोमवारी पहाटे होऊन त्यामध्ये आर्किटेक्ट रवींद्र साळुंखे यांचा बळी गेला. पोलीस आणि महापालिका प्रशासन जागे होण्यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते अमर माने यांनी स्वखर्चाने सहकारी अमित हलेकर, अशोक जावीद, युवराज पाटील, रमेश माने, खंडेराव माने, राजु तोरणे, अक्षय माने, विशाल माने, अनिल कोळेकर, अक्षय गेजगे, आदींच्या मदतीने अपघातस्थळी फलक लावून दुभाजकास रेड स्टिकर लावले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी कौतुक केले. (प्रतिनिधी)