‘त्या’ उपनिरीक्षकाची चौकशी?
By Admin | Updated: July 9, 2015 00:33 IST2015-07-09T00:33:53+5:302015-07-09T00:33:53+5:30
गोळीबार प्रकरण : चोरट्या दारूचा पर्दाफाश करणार

‘त्या’ उपनिरीक्षकाची चौकशी?
राजापूर : उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हवेत गोळीबार करून पकडलेली गोवा बनावटीची दारू राजापूर तालुक्यातील वाल्ये येथे नेली जाणार असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान, या दारू वाहतूक प्रकरणामध्ये असणाऱ्या साखळीचा लवकरच पर्दाफाश केला जाईल व आणखी काहीजणांना अटक केली जाईल, अशी माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास गावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या कारवाईत हवेत गोळीबार करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक प्रमोद कांबळे यांची स्वतंत्रपणे चौकशी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गेली अनेक वर्षे गोवा मार्गे कोकणसह लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यात गोव्यातून चोरट्यामार्गे दारूचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा केला जात असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या काही महिन्यांत ठिकठिकाणी धाडी टाकून गोवा बनावटीचे मद्य पकडले होते. या सर्व प्रकारांमध्ये साखळी असून, त्याचा तपास वेगाने सुरू आहे. लवकरच या प्रकरणातील अन्य आरोपीही जाळ््यात सापडतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पळून जाणाऱ्या गाडीमध्ये गोवा बनावटीच्या दारूसह केवळ दोनच आरोपी व तेही नि:शस्त्र असताना उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर हवेत गोळीबार करण्याची वेळ का आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आजपर्यंत राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणात धाडी टाकत कोट्यवधी रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.
मात्र, गोळीबार करण्याची वेळ कधीही आली नव्हती. या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना सन २०१२ मध्येही चोरटी दारू वाहतूक करताना पकडण्यात आले होते, अशी माहितीही समोर आली आहे.
दोन दिवस पोलीसकोठडी
सोमवारच्या कारवाईत अटक करण्यात आलेल्या प्रदीप विश्वनाथ निग्रे व दत्ताराम रामचंद्र राऊत यांना राजापूर पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्या दोघांनाही १० जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.