‘आयसीयू’त अभ्यास, रुग्णवाहिकेतून परीक्षा
By Admin | Updated: March 7, 2015 01:04 IST2015-03-07T00:41:23+5:302015-03-07T01:04:34+5:30
‘ज्योती’ची इच्छाशक्ती : हृदयरोगाच्या वेदना सहन करुनही देत आहे दहावीचे पेपर

‘आयसीयू’त अभ्यास, रुग्णवाहिकेतून परीक्षा
कोल्हापूर : केवळ प्रखर इच्छाशक्ती, शिक्षणाचा ध्यास यांच्या जोरावर हृदयविकाराच्या मरणयातना सहन करूनही ‘ती’ दहावीची परीक्षा रुग्णवाहिकेतून जाऊन देत आहे. ज्योती पाटील (रा. दिंडनेर्ली, ता. करवीर) असे तिचे नाव आहे. रुईकर कॉलनीतील स्वस्तिक हॉस्पिटलच्या ‘आयसीयू’मध्ये नाकाला आॅक्सिजनची नळी, एका हाताला सलाईन आणि दुसऱ्या हातात पुस्तक घेऊन ज्योती अभ्यास करीत आहे.
ज्योती धडधाकट होती. परिस्थिती गरिबीची असल्यामुळे अनेक संकटांवर मात करीत तिने नववीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दहावीच्या वर्गात आल्यानंतर तिने वर्षभर जिद्दीने अभ्यास केला. अलीकडे तिला सातत्याने धाप, खोकल्याचा त्रास होऊ लागला. वैद्यकीय तपासणीनंतर तिला हृदयविकाराचा त्रास असल्याचे स्पष्ट झाले. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अर्जुन आडनाईक यांनी स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये तिला उपचारासाठी दाखल करून घेतले. तिच्यावर चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत.
दरम्यानच्या काळात मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. परीक्षेच्या वेळीच उपचार घेण्यासाठी दाखल झाल्यामुळे परीक्षा चुकली तर वर्ष वाया जाणार असे तिला वाटू लागले. ही अस्वस्थताच तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने वारंवार डॉक्टरांकडे परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली. ‘पहिल्यांदा प्रकृती बरी होऊ दे, मग परीक्षा दे,’ असे डॉक्टरांनी तिला सांगितले.
मात्र, तिने परीक्षा देणारच असा आग्रह धरला. शेवटी डॉक्टरांचाही नाइलाज झाला. तिच्या मनाविरुद्ध जाणे अवघड झाले. डॉक्टरांनीही तिला ‘आयसीयू’तच अभ्यास करण्याची मुभा दिली. इस्पुर्ली येथील परीक्षा केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध केली. त्यामुळे ती दहावीची परीक्षा देत आहे.