धर्मवादाला बगल देऊन अभ्यास करा

By Admin | Updated: July 10, 2015 00:06 IST2015-07-10T00:06:29+5:302015-07-10T00:06:29+5:30

राजा दीक्षित : शिवाजी विद्यापीठातील व्याख्यानात नवीन संशोधकांना कानमंत्र

Study with the help of arbitrariness | धर्मवादाला बगल देऊन अभ्यास करा

धर्मवादाला बगल देऊन अभ्यास करा

कोल्हापूर : पुराभिलेखागारांमध्ये असणाऱ्या कागदपत्रांइतकाच साहित्याचा आणि भाषेचा अभ्यास इतिहासकाराला अत्यंत उपयुक्त आहे. नवीन संशोधकांनी संकुचित धर्मवाद, जातवाद, प्रादेशिक अस्मिता यांना बगल देऊन महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करावा, असे आवाहन पुणे विद्यापीठातील प्रा. राजा दीक्षित यांनी बुधवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागातर्फे आयोजित निमंत्रित व्याख्यानमालेत ते बोलत होते.‘मराठी माणसांची ऐतिहासिक जडणघडण’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. इतिहास विभागातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख प्रा. पद्मजा पाटील होत्या.प्रा. दीक्षित म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास हा मराठी मानसिकतेचा इतिहास आहे. भौगोलिक ढाच्यामध्ये त्याला बंदिस्त करता येणार नाही. ग्यानबा-तुकोबा आणि शिवबा या तिघांबद्दलचा आदर हे मराठी अस्मितेचे लक्षण आहे. मराठीपणाची नेमकी व्याख्या काय किंवा मराठी अस्मितेची व्यवच्छेदक लक्षणे नेमकी कोणती याची मीमांसा करत असताना प्रा. दीक्षित यांनी महाराष्ट्राच्या समावेशकता आणि समन्वयवादी भूमिकेची पाळेमुळे अगदी प्रागैतिहासिक काळापर्यंत कशी शोधता येतात याचे विवेचन केले. गुरुचरित्र अथवा महिकावतीची बखर यामध्ये येणाऱ्या ‘महाराष्ट्र धर्म’ या संज्ञेची उत्पत्तीच मुळी हिंदू-मुस्लिम संस्कृतीच्या समन्वयाशी कशी जोडलेली आहे याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. प्रा. पद्मजा पाटील म्हणाल्या, पारंपरिक इतिहासकार इतिहास लेखनासाठी संदर्भसाधन म्हणून साहित्याला फारसे महत्त्व देत नसत पण साहित्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते. मध्ययुगातील प्रसिद्ध संतकवयित्री बहिणाबार्इंच्या अभंगांचे नाते आजच्या अगदी आधुनिक काळातील स्त्रीवादी लेखनाशी जुळते हे त्यांचा अभ्यास केल्यानंतर दिसून येते आणि त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासताना मराठी साहित्याचा साधन म्हणून वापर करणे महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमास प्रा. डॉ. एम. ए. लोहार, नीलांबरी जगताप, डॉ. मंजुश्री पवार, प्रा. कल्पना मेहता, डॉ. संतोष जठीथोर आदी उपस्थित होते. डॉ. अवनिश पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदा पारेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Study with the help of arbitrariness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.