अॅम्ब्युलन्समधून परीक्षा देणारा विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’
By Admin | Updated: May 28, 2015 01:00 IST2015-05-28T00:45:02+5:302015-05-28T01:00:40+5:30
जिद्दी तरुणाची कहाणी : कुटुंबीयांसह मित्रांमध्येही आनंदाचे वातावरण

अॅम्ब्युलन्समधून परीक्षा देणारा विद्यार्थी ‘फर्स्ट क्लास’
कऱ्हाड : बारावी परीक्षेच्या कालावधीत एखादी अनुचित घटना घडली तर त्याचा दूरगामी परिणाम विद्यार्थ्याच्या भावी आयुष्यावर होतो. असाच काहीसा प्रकार कऱ्हाडातील नितीन चव्हाण या परीक्षार्थी विद्यार्थ्याबाबत घडला होता. परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वी नितीनला हृदयविकाराचा धक्का बसला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण परिस्थितीसमोर हार न मानता नितीनने महाविद्यालयाच्या आवारात अॅम्ब्युलन्समध्ये बसून बारावीचा पेपर दिला होता. अॅम्ब्युलन्समध्ये बसून परीक्षा देणारा हा नितीन बारावी परीक्षेत ‘फर्स्ट क्लास’मध्ये ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या जिद्द व मेहनतीने पालकांसह शहरवासीयही भारावून गेलेत.
कऱ्हाडच्या गाडगे महाराज महाविद्यालयाचा विद्यार्थी नितीन संजय चव्हाण याने बारावी परीक्षेसाठी तयारी केलेली. २१ फेब्रुवारी रोजी त्याचा बारावीचा पहिला पेपर होता. या पेपरचा त्याचा अभ्यासही पूर्ण होत आलेला. मात्र, अशातच १८ फेब्रुवारीला रात्री झोपेतच नितीनला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नितीनवर उपचार सुरू झाले. नितीन मृत्यूशी झुंज देत होता. दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला खरा; पण त्याने बारावीची परीक्षा देण्याची इच्छा बोलून दाखविली. अखेर याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून कुटुंबीयांनी नितीनला पेपरसाठी अॅम्ब्युलन्समधून महाविद्यालयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाविद्यालयाच्या आवारात थांबविण्यात आलेल्या रुग्णवाहिकेतच नितीनने बारावीचा पहिला पेपर दिला. त्यापुढील सर्व पेपरही नितीनने अशाच पद्धतीने दिले. आज बारावीचा निकाल जाहीर झाला. नितीनच्या कुटुंबीयांनी तातडीने नितीनचा निकाल आॅनलाईन पाहिला आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. नितीन बारावीत ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाला. (प्रतिनिधी)