विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी ‘विज्ञान’कडे कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:27 IST2021-09-18T04:27:00+5:302021-09-18T04:27:00+5:30
कोल्हापूर : कोरोनामुळे रोजगार, कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे यावर्षी दिसत आहे. त्यामुळे शहरातील विविध ...

विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी ‘विज्ञान’कडे कल
कोल्हापूर : कोरोनामुळे रोजगार, कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अधिक ओढा असल्याचे यावर्षी दिसत आहे. त्यामुळे शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीसाठी प्रवेश क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यात अधिकतर विद्यार्थ्यांचा विज्ञान विद्याशाखेतून अकरावी करण्याकडे अधिक कल आहे. या विद्याशाखेतून पहिल्या फेरीत २१६० विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली आहे. केंद्रीय समितीने प्रवेशाची दुसरी फेरी शुक्रवारी सुरू केली.
समितीने पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी ७,३५६ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली होती. त्यापैकी एकूण ४२२१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. प्राधान्यक्रम दिलेले आणि हवे असणारे महाविद्यालय मिळाले नसल्याने उर्वरित ३१३५ जणांनी प्रवेश घेतले नाहीत. त्यामुळे रिक्त राहिलेल्या १०४५९ जागांवरील प्रवेशासाठी केंद्रीय समितीने दुसरी फेरीची प्रक्रिया शुक्रवारी सुरू केली. त्याअंतर्गत नव्याने अर्ज करणे, अर्जात बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्याच्या पहिल्या दिवशी कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेचे ४१९ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. त्यात विज्ञानच्या २४०, वाणिज्य मराठीच्या ५८, वाणिज्य इंग्रजी ९९, कला मराठी १७, तर कला इंग्रजीसाठीच्या पाच अर्जांचा समावेश आहे. दुसऱ्या फेरीत अर्ज करण्याची मुदत रविवार (दि. १९) पर्यंत आहे. त्यानंतर अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू होईल.
पहिल्या फेरीतील प्रवेशनिश्चिती
विज्ञान : २१६०
वाणिज्य मराठी : ७५४
वाणिज्य इंग्रजी : ६३५
कला मराठी : ६२२
कला इंग्रजी : ५०
प्रतिक्रिया
वैद्यकीय, अभियांत्रिकी आदी क्षेत्रात करिअर करता येईल असा विचार पालक, विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे यावर्षी अधिकतर विद्यार्थ्यांचा विज्ञान विद्याशाखेकडे कल असल्याचे दिसून येत आहे.
-पी. एस. जाधव, उपप्राचार्य, कमला कॉलेज