आंतरराष्ट्रीय योगदिनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
By Admin | Updated: June 22, 2015 00:14 IST2015-06-21T23:53:08+5:302015-06-22T00:14:35+5:30
शिरोली दुमाला येथे योगाची प्रात्यक्षिके

आंतरराष्ट्रीय योगदिनाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय छात्रसेनायेथील महासैनिक दरबार हॉलमध्ये ५६ महाराष्ट्र बटालियनतर्फे रविवारी ३६१ राष्ट्रीय छात्रसैनिकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने योगधारणा केली. कर्नल पी. सी. पवार यांच्या हस्ते योगासनांची सुरुवात झाली. यावेळी ‘क्रिडाई’ महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव परीख यांची प्रमुख उपस्थिती होती.लाईन बझार येथील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या या योग शिबिरासाठी परिसरातील दहा महाविद्यालयांसह कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सकाळी सात ते ७.३५ या दरम्यान योगासने केली. मानवाची शारीरिक व मानसिक स्थिती मजबूत ठेवणारी योग विद्या हा अद्भुत ठेवा आहे. भारताच्या या योगविद्येचे महत्त्व जगाला पटले आहे. दररोज योगासने करून शरीर व मनसंपदा तंदुरुस्त ठेवा, असे कर्नल पवार यांनी आवाहन केले. कृषी महाविद्यालयाचे प्रा. सुनील फुलसावंगे व गोखले महाविद्यालयाचे प्रा. बसुगडे यांनी आयोजनामध्ये सहभाग घेतला.छात्रसैनिक विद्यार्थिनींचा उत्साही सहभाग कृष्णा सांस्कृतिक भवनाची दोन सभागृहे व स्वामी विवेकानंद महाविद्यालयात ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीच्या छात्रसैनिक विद्यार्थिनींनी पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग प्रात्यक्षिके सादर केली. कोल्हापूर, सांगली, सातारा व रत्नागिरी या चारही जिल्ह्यांंतील एकूण १७ शाळा व १७ महाविद्यालयांमधील १,४१० छात्रसैनिक विद्यार्थिनींनी यामध्ये सहभागी झाल्या होत्या.यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून गायत्री शेवडे, पल्लवी बेंडके, लता देशमुख, आशा पाटील यांनी छात्रसैनिक विद्यार्थिनींकडून योगासनांचा सराव करून घेतला होता. ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीचे कामांडिंग आॅफिसर कर्नल चंद्रशेखर देशपांडे, प्रशिक्षणाधिकारी कर्नल आर. बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला. एनसीसीच्या आॅनररी मेजर प्रा. डॉ. रूपा शहा, सुभेदार मेजर दिनकर पाटील, सोनिया यादव यांनी विशेष योगदान दिले. एनसीसीच्या कोल्हापूर गटमुख्यालयाचे प्रमुख ब्रिगेडिअर पवनकुमार गंजू यांनी प्रात्यक्षिकांच्या ठिकाणी भेट देऊन या सर्व तयारीबद्दल सहकाऱ्यांचे मनापासून कौतुक केले.
विवेकानंद महाविद्यालय
विवेकानंद महाविद्यालयात मोठ्या उत्साहात योग दिन साजरा झाला. प्राचार्य शुभांगी गावडे व योग अभ्यासिका शुभदा कामत यांनी योगाचे महत्त्व समजावून दिले. यावेळी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. योग दिनाच्या आयोजनात क्रीडाशिक्षकांनी महत्त्वाचे योगदान दिले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशभूषण विद्यामंदिर हायस्कूल
देशभूषण हायस्कूल येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी टी. एल. मोळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक आर. ए. गाट, एम. एस. सपाटे, ए. एस. वागरे, आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
यशवंतराव पाटील हायस्कूल
कसबा बावडा येथील यशवंतराव भाऊराव पाटील हायस्कूलमध्ये जागतिक योगदिनानिमित्त रामराजे सुतार यांनी योगामुळे शरीरावर होणारे चांगले परिणाम याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
यावेळी मुख्याध्यापिका गौतमी पाटील, कलाशिक्षक दत्तात्रय चौगुले, शर्मिला पाटील, स्नेहाराणी साखळकर, नीता पाटील, संदीप कांबळे, शीतल भांगरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कर्मवीर इंग्लिश स्कूल
बोंद्रेनगर रिंग रोड येथील कर्मवीर इंग्लिश स्कूल व शुभंकरोती प्ले स्कूलच्या वतीने योगदिनानिमित्त योगासन प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी योगतज्ज्ञ श्रद्धा लाड, डॉ. संयोगिता पाटील, रवी पाटील, संजय दंडगे, डॉ. प्रियांका सावंत, डॉ. संदेश कचरे, प्राचार्य ए. के. कचरे, सचिन पुंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पालकही सहभागी झाले होते.
हरिहर हायस्कूल
लक्ष्मीपुरी येथील हरिहर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापिका एस. एस. जोशी यांनी योगासनांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. यावेळी एस. पी. पाटील, आर. बी. पाटील यांच्यासह पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
जीवन कल्याण प्राथमिक विद्यालय
कसबा बावडा येथील जीवन कल्याण विद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी क्रीडाशिक्षक टी. आर. पाटील यांनी योगाचे महत्त्व पटवून देत योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी मुख्याध्यापक मोहन आवळे, कुमार पाटील, सरदार पाटील यांच्यासह ४९४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
शिरोली दुमाला येथे
योगाची प्रात्यक्षिके
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या वतीने शिरोली दुमाला येथील एकनाथ विद्यालय व छत्रपती शिवाजीराजे हायस्कूल येथे ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगासनांची प्रात्यक्षिके व माहिती दिली. यावेळी अनिल सोलापुरे, संजय पाटील, माधव पाटील, संभाजी पाटील, सचिन पाटील, राहुल पाटील, ग. ज. पाटील, के. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.