भीमगोंडा देसाई कोल्हापूर : महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये १ हजार ५३ विद्यार्थी शिक्षण घेत असले, तरी सातवी, आठवीनंतर शिक्षणाची आणि करिअरची वाट बिकट आहे. प्रशासनात, उच्चशिक्षणात उर्दू शिक्षणाचा फारसा उपयोग नाही, तरीही मुस्लीम समाजाचा घट्ट पगडा असलेल्या गरीब कुटुंबांतील विद्यार्थी उर्दू माध्यमात शिकत आहेत. मराठी, इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत त्यांना भविष्यातील संधी मर्यादित असल्याने त्यांचे करिअरही अंधकारमय होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शहरात महापालिकेच्या तीन सातवीपर्यंत, एक आठवीपर्यंत शाळा आहेत. बारावीपर्यंत उर्दू माध्यमांच्या दोन शाळा स्वतंत्र आहेत. करिअरमध्ये अडचणी आल्याने काळाच्या ओघात सिंधीसह इतर माध्यमांच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली. त्या बंद झाल्या, पण उर्दू माध्यमांच्या शाळांतील पटसंख्या मात्र टिकून राहिली. प्रत्येक वर्षी या शाळेत पहिलीला प्रवेश होत आहेत. आठवी ते बारावीपर्यंत उर्दू शिक्षणाच्या केवळ दोन शाळा आहेत. उर्दू माध्यमातून पदवी घेण्यासाठी शहर, जिल्ह्यात एकही दर्जेदार महाविद्यालय नाही. यामुळे उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण उर्दू माध्यमातून करणे अडचणीचे आहे.महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. शिक्षक, मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाल्यानंतर तातडीने भरली जात नाहीत. विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. गुणवत्ताही घसरत आहे. दर्जेदार शैक्षणिक सुविधांचा अभाव आहे. चांगल्या इमारती नाहीत. मैदान नाही. अशा स्थितीत मुले शिक्षण घेत आहेत. मात्र, उर्दू शिक्षणानंतर उच्चशिक्षण, करिअरमध्ये संधी फार कमी आहेत. यांना पुन्हा मराठी किंवा इंग्रजी माध्यमांकडे यावे लागते. हे शक्य नसेल, तर शिक्षणालाच पूर्णविराम द्यावा लागत आहे, म्हणून उर्दू शिक्षण घ्यायचे का, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुढाऱ्यांची मुले, नातवंडे इंग्रजी मराठी माध्यमातमुस्लीम समाजातील अनेक पुढारी, नेत्यांची मुले चांगल्या इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळेत शिक्षण घेतात. याउलट गरीब कुटुंबातील मुले, मुली उर्दू माध्यमात शिक्षण घेत आहेत, असे वास्तव चित्र आहे. उर्दू शिक्षण घेऊन नोकरी, उद्योगात संधी मिळाली नाही, तर त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण होतो. त्यांना मजुरी किंवा फळ, भाजीपाला विक्री करून कुटुंब चालवावे लागते.
एक हजारावर विद्यार्थ्यांसाठी केवळ ३७ शिक्षकमहापालिकेच्या पाच उर्दू माध्यमांच्या शाळांत एक हजारावर विद्यार्थी शिकत असूनही त्यांना केवळ ३७ शिक्षक अध्यापनाचे काम करतात. पाच जागा अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. सर्वच शाळांत दोन वर्गांसाठी एक शिक्षक अशी अनेक वेळा स्थिती असते. यामुळे गुणवत्तेचा फज्जा उडत असल्याच्या तक्रारी आहेत.