विद्यार्थ्यांना मिळणार ‘मोबाईल ट्युटर’
By Admin | Updated: October 16, 2015 00:11 IST2015-10-15T01:04:43+5:302015-10-16T00:11:46+5:30
शिवाजी विद्यापीठ : तंत्रज्ञान विभागाचा चेन्नईच्या एम-ट्युटरशी सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना मिळणार ‘मोबाईल ट्युटर’
कोल्हापूर : विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण प्रणालीत स्मार्ट फोन, टॅबलेट्सवरही अभ्यास करता यावा, यादृष्टीने शिवाजी विद्यापीठाने चेन्नईच्या ‘एम-ट्युटर’ कंपनीसमवेत सोमवारी सामंजस्य करार केला. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विषयातील ‘मोबाईल ट्युटर’ उपलब्ध होणार आहेत.विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग आणि एम-ट्युटर यांच्यात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व ‘एम-ट्युटर’चे उपाध्यक्ष भारत सुंदरम यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ‘एम-ट्युटर’ ही संकल्पना विद्यार्थी, शिक्षकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या केवळ प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा वर्षअखेरीपर्यंत उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमास ‘एम-ट्युटर’ कंपनीचे उपाध्यक्ष शेनबाग राज आर, विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. एस. एस. कोळेकर, आर. सी. रणवीर, महेश साळुंखे, नितीन अळझेंडे, अनिल रणवीर, पी. डी. पाटील, ए. ए. मांजरेकर, एच. ए. तिरमारे, एच. पी. खंडागळे, आदी उपस्थित होते. हर्षवर्धन पंडित यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. साहू यांनी आभार मानले.
कराराचा उपयोग असा...या करारानुसार बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘एम-ट्युटर’ कंपनी त्यांच्या अभ्यासक्रमावर आधारित अॅप तयार करणार असून, विद्यापीठाची वेबसाईट, कंपनीच्या वेबसाईटसह विद्यार्थ्यांना डेस्कटॉप, लॅपटॉप, स्मार्ट फोन्स व टॅब यावर अॅप डाऊनलोड करून अभ्यास करता येणार आहे. अभ्यासक्रमातील विविध विषयांवर १५-१५ मिनिटांचे ट्युटोरिअल्स तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी आॅडिओ-व्हिज्युअल व अॅनिमेशनचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे त्या ट्युटोरिअल्सवर आधारित असेसमेंट प्रश्नही विचारण्यात येतील. या एम-ट्युटरमुळे विद्यार्थ्यांची अभ्यास लक्षात ठेवण्याची क्षमता वाढेल, असे भारत सुंदरम यांनी सांगितले.