विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी शहराकडे ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:19+5:302021-07-19T04:16:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ...

विद्यार्थ्यांचा अकरावीसाठी शहराकडे ओढा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा शहराकडे ओढा आहे. त्यात अधिकतर उपनगर आणि शहरालगतच्या दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील गावांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरातील विविध ३५ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन केंद्रीय प्रक्रिया राबविण्यात येत आहे. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षेची (सीईटी) प्रतीक्षा लागली आहे.
ग्रामीण भागातील गडहिंग्लज, कागल, राधानगरी, इचलकरंजी, वारणा आदी परिसरातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थी हे त्यांच्या गावापासून जवळ असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होतात. मात्र, उपनगरे आणि शहरालगतच्या करवीर तालुक्यातील विविध गावांमधील विद्यार्थ्यांचा शहरातील महाविद्यालयांमधील प्रवेशाकडे ओढा आहे. गेल्या सात-आठ वर्षांपूर्वी या विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणि विद्यार्थ्यांची धावपळ थांबविण्याच्या उद्देशाने शहरातील ३५ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू केली. गेल्या दोन वर्षांपासून ही प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. शहरातील अकरावीची प्रवेशक्षमता १४८६०, तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५० महाविद्यालये असून त्यांची प्रवेशक्षमता ३५ हजार इतकी आहे. पण, गेल्या पाच वर्षांपासून आयटीआयकडील विद्यार्थ्यांचा कल वाढल्याने शहर आणि ग्रामीण भागातील अकरावीच्या ४० ते ६० टक्के जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशापासून एकही विद्यार्थी वंचित राहत नसल्याचे चित्र आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया शहरात ऑनलाईन तर ग्रामीण भागात ऑफलाईन पध्दतीने राबविली जाते. यावर्षीदेखील हीच पध्दत राहणार आहे. प्रवेश प्रक्रिया सीईटीच्या गुणांवर होणार असल्याने या परीक्षेची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.
पॉईंटर
शहरात अकरावी प्रवेश देणारी कनिष्ठ महाविद्यालये : ३५
एकूण जागा : १४८६०
गेल्यावर्षी किती अर्ज आले : १२९६१
किती जणांनी प्रवेश घेतला : ६८७३
किती जागा रिक्त राहिल्या : ७८०७
चौकट
शहरातील ४० टक्के जागा रिक्त
गेल्या तीन वर्षांपासून अकरावीसाठी शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेशित होण्याकडील विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे दिसत आहे. साधारणत: ४० ते ५० टक्के जागा रिक्त राहत असल्याचे सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांनी सांगितले.
ऑनलाईन प्रवेश व्हावेत
प्रवेशाची प्रक्रिया गतीने होण्यासाठी ऑनलाईन पद्धत महत्त्वाची आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांप्रमाणे यावर्षीही शहरातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने व्हावी.
-प्रभाकर हेरवाडे, सचिव, दि. न्यू एज्युकेशन सोसायटी.
शहरातील महाविद्यालयांच्यादृष्टीने अकरावीसाठी ऑनलाईन प्रक्रिया, तर ग्रामीण भागासाठी ऑफलाईन प्रक्रिया योग्य आहे. ती यापुढेही कायम राहावी.
-सी. एम. गायकवाड, आजीव सेवक, श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग.