जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळवली नऊ कोटींची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:28 IST2021-08-20T04:28:56+5:302021-08-20T04:28:56+5:30
आठवीमधील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातून ११ हजार ६८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात ...

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मिळवली नऊ कोटींची शिष्यवृत्ती
आठवीमधील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातून ११ हजार ६८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कोल्हापूर जिल्ह्यात १८९४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. राज्यात तिसऱ्यांदा कोल्हापूर जिल्हा अव्वल ठरला असून पालघर आणि पुणे हे दोन जिल्हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची राज्याच्या तुलनेत १६.२१ इतकी टक्केवारी असून सलग तिसऱ्या वर्षी यशस्वी विद्यार्थ्यांची वाढती संख्या राहिली आहे.
पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या निकालामध्ये गेली अनेक वर्षे कोल्हापूर जिल्ह्याचा दबदबा राहिला आहे. तो वाढवण्याचे काम या निकालाने केले आहे. कोरोनाकाळातही ऑनलाईन शिक्षण सुरू असताना आणि विद्यार्च्यांच्या नेहमीच्या अध्ययनामध्ये अडथळे असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे हे विशेष.
चौकट
राज्यातील पहिले सहा जिल्हे
जिल्हा यशस्वी विद्यार्थी
१ कोल्हापूर १८९४
२ पुणे ७९७
३ अहमदनगर ६४१
४ धुळे ५५१
५ सातारा ५२५
६ नाशिक ५२३
कोट
वास्तविक यंदा २००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी असे आमचे उद्दिष्ट होते; परंतु पुढील वर्षी ही संख्या वाढावी यासाठी प्रयत्नशील राहू. सर्व विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक, पालक यांचे अभिनंदन. कोल्हापूर जिल्ह्याची हीच परंपरा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
किरण लोहार,
माध्यमिक शिक्षणाधिकारी,
कोट
छत्रपती शाहू महाराजांच्या क्रांतिकारी वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्याने विविध क्षेत्रांत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शिष्यवृत्तीच्या परीक्षेपाठोपाठ राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतील या यशामुळे कोरोना काळातही जिल्ह्यात उत्तम पद्धतीने अध्यापन सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे अभिनंदन करतो.
संजयसिंह चव्हाण,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर.