विद्यार्थी देवळात.. अंगणवाडी इमारत पडूनच
By Admin | Updated: July 6, 2015 00:27 IST2015-07-05T23:47:03+5:302015-07-06T00:27:49+5:30
किरकोळ कारण : ग्रामपंचायतीची उदासीनता

विद्यार्थी देवळात.. अंगणवाडी इमारत पडूनच
ज्योतीप्रसाद सावंत ल्ल आजरा
येथील अंगणवाडी क्रमांक १०९ ची इमारत बांधून तीन वर्षांचा कालावधी झाला, तरी अद्याप किरकोळ कारणामुळे अंगणवाडी इमारत पडूनच आहे. तर ज्यांच्याकरिता इमारत बांधली ते विद्यार्थी मात्र सोमवार पेठेतील सोमेश्वर मंदिरातच बसविले जात आहेत.
चाफे गल्ली येथील रमेश कोगेकर कॉलनीमध्ये तब्बल नऊ गुंठ्यांच्या क्षेत्रात अंगणवाडीची इमारत बांधण्यात आली आहे. तत्कालीन सरपंच जनार्दन टोपले यांच्या प्रयत्नातून ही इमारत बांधण्यात आली. इमारतीच्या आवारात संपूर्ण तारेचे कुंपण बांधण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीकडून केवळ नळ पाणीपुरवठा कनेक्शन व किरकोळ डागडुजी केल्यास या इमारतीत अंगणवाडी भरण्यात काहीही अडचण नाही. केवळ ग्रामपंचायतीच्या उदासीनतेमुळे अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सोमेश्वर मंदिरात बसावे लागत आहे. याबाबत पालकवर्गातही नाराजी व्यक्त होत आहे. इमारत वापराअभावी पडून असल्याने काही शाळकरी मुलांनी खिडक्यांच्या काचा फोडल्या आहेत.
अनेक इमारतींची अवस्था सारखीच
आजरा शहरामध्ये अनेक शासकीय इमारती वापराविना पडून आहेत. ज्या केवळ बांधण्यात आल्या आहेत; पण प्रत्यक्षात त्या इमारतींचा काहीही वापर होत नाही. यामध्ये पोलीस ठाण्याची नूतन इमारत, मच्छी मार्केटशेजारील इमारत, बचत भवन, आदींचा समावेश आहे.