विद्यार्थ्यांचा कल कॉमर्स शाखेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:42 IST2017-07-18T00:42:29+5:302017-07-18T00:42:29+5:30
अकरावीची कट आॅफ लिस्ट जाहीर : कला शाखेकडील अर्ज घटले; विज्ञान ‘जैसे-थे’; प्रत्यक्ष प्रवेश आजपासून

विद्यार्थ्यांचा कल कॉमर्स शाखेकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमातील वाणिज्य शाखेकडे (कॉमर्स) विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे या माध्यमाच्या दोन तुकड्या वाढविल्या आहेत. विज्ञान शाखेकडील स्थिती ‘जैसे-थे’ आहे. कला शाखेला कमी प्रतिसाद आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अकरावीसाठी १४०० अर्ज कमी दाखल झाले आहेत. निवड यादी पाहण्यासाठी सोमवारी दुपारी तीननंतर शहरातील विविध महाविद्यालयांवर भरपावसात विद्यार्थ्यांनी गर्दी केली. यादीनुसार प्रवेशाची प्रक्रिया आज, मंगळवारपासून सुरू होणार आहे.
केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे मुख्य केंद्र असलेल्या न्यू कॉलेजमध्ये शिक्षण उपसंचालक व समितीचे अध्यक्ष एम. के. गोंधळी आणि कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे यांनी दुपारी बारा वाजता निवड यादी जाहीर केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष गोंधळी म्हणाले, वाणिज्य इंग्रजी शाखेची एकूण प्रवेश क्षमता ८८० असून, त्यासाठी १४२९ अर्ज दाखल झाले आहेत. जादा ५४९ जागांवरील प्रवेशासाठी डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, विवेकानंद महाविद्यालयाला स्वयंअर्थसाहाय्यित तुकडी दिली आहे. यावर्षी अकरावीच्या एकूण १३९६० जागांच्या तुलनेत १२४८९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यात २५ टक्के इन हाऊस कोट्यातील अर्जांचादेखील समावेश आहे. क्षमतेपेक्षा कमी अर्ज असल्याने सर्वांना प्रवेश मिळेल. विज्ञान शाखेच्या एकूण प्रवेश क्षमतेपेक्षा ८८ जादा अर्ज आले असून त्यासाठी अनुदानित तुकडीतील प्रवेश क्षमता ३० जागांनी वाढवून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता व आरक्षण लक्षात घेऊन निवड यादी तयार केली आहे. कार्याध्यक्ष प्राचार्य नलवडे म्हणाले, यावर्षी इंग्रजी माध्यमातील वाणिज्य शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. विज्ञानची स्थिती गेल्यावर्षीसारखीच आहे. ‘कट आॅफ’मध्ये काही महाविद्यालयांमध्ये अर्धा टक्क्याची यंदा वाढ झाली आहे. मराठी माध्यमातील वाणिज्य शाखेसाठी क्षमतेपेक्षा ६४४, तर कला मराठी आणि इंग्रजी विषयासाठी क्षमतेपेक्षा एकूण २०२७ अर्ज कमी दाखल झाले आहेत. यावर्षी दहावीचा निकाल उशिरा लागल्याने आणि आयटीआय, ‘तंत्रनिकेतन’ची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू झाल्याने अकरावीसाठीच्या अर्जांची संख्या घटली आहे.
पत्रकार परिषदेस प्रा. टी. के. सरगर, केतन शिंदे, पवन तुराळ, आदी उपस्थित होते. दरम्यान, दुुपारी तीननंतर कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या (६६६.८िीि‘ङ्मस्र.ङ्म१ॅ) या संकेतस्थळ, (‘ङ्म’ँंस्र४१ 11३ँ अे्रि२२्रङ्मल्ल) या मोबाईल अॅप आणि महाविद्यालयांच्या सूचनाफलकांवर यादी प्रसिद्ध झाली.
पुढील वर्षी आॅनलाईन प्रक्रिया
कोल्हापुरात सलग सातव्या वर्षी अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्याला महाविद्यालय, विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रक्रियेत आणखी एक नवे पाऊल म्हणून पुढील वर्षी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे आॅनलाईन पद्धतीने राबविण्यात येईल, असे समितीचे अध्यक्ष एम. के. गोंधळी यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यात पहिल्यांदाच कोल्हापूरने ‘मोबाईल अॅप’वर निवड यादी, कट आॅफ आदींची माहिती देणे गेल्यावर्षी सुरू केले. या अॅपचा यावर्षी ११२० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
न्यू कॉलेजची आघाडी
शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धत राबविण्यात आली. यंदा प्रवेशाच्या टक्केवारीमध्ये विज्ञान शाखेत ९२.२० टक्के, वाणिज्यमध्ये ८१.८० टक्के, तर कला शाखेत ७०.६० टक्क्यांसह न्यू कॉलेज आघाडीवर आहे. गेल्यावर्षी आघाडीमध्ये असणारे विवेकानंद महाविद्यालय हे द्वितीय स्थानावर आहे. त्यापाठोपाठ राजाराम महाविद्यालय, कमला महाविद्यालय, गोखले कॉलेज, एस. एम. लोहिया ज्युनिअर कॉलेज आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा मूळ दाखला (त्यावर युडायस नंबर असणे आवश्यक), आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला, आधारकार्डच्या दोन छायांकित प्रती, दोन छायाचित्रे, विद्यार्थिंनीसाठी प्रतिज्ञापत्र.
शाखानिहाय शुल्क
अनुदानित कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी ५४० ते ७०० रुपयांपर्यंत प्रवेशशुल्क आहे. विनाअनुदानित विज्ञानसाठी सात हजार, वाणिज्यसाठी पाच हजार आणि कला शाखेसाठी चार हजार रुपये असे शुल्क आहे.
मागील वर्ष आणि
यावर्षीचे दाखल अर्ज
माध्यमसन २०१६२०१७
विज्ञान७०१२५९६८
वाणिज्य (इंग्रजी)१२५०१४२९
वाणिज्य (मराठी)२९८७२७१६
कला१९९८१७७७