म्हासुर्ली - राधानगरी : बारावीच्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याच्या नैराश्येतून कोनोली तर्फ असंडोली पैकी कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील विद्यार्थिनी साधना पांडुरंग टिंगे (वय १८) हिने घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी एकच्या दरम्यान ही घटना घडली. साधना ही कोनोलीतर्फ असंडोलीच्या सरपंच वृषाली पांडुरंग टिंगे यांची कन्या आहे.अधिक माहिती अशी की, साधना ही पनोरे (ता. पन्हाळा) येथील कॉलेजमध्ये बारावी सायन्सच्या वर्गात शिकत होती. नुकत्याच लागलेल्या बारावीच्या परीक्षेत तिला ४८ टक्के गुण मिळाले. अपेक्षेपेक्षा गुण कमी आहे, असे तिला वाटल्याने ती निकालानंतर काही दिवस निराश होती. गुरुवारी घरात कोणी नसल्याचे पाहून घरातील तुळईला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशिरा या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे हे करीत आहेत. तिच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ, चुलते असा मोठा परिवार आहे.साधनाची आई कोनोली तर्फ असंडोलीची सरपंच आहे. तिच्या दोन चुलत बहिणी आणि एका चुलत बहिणीचा पती असे जवळचे तीन नातेवाईक पोलिस दलात कार्यरत आहेत. मात्र तरीही तिने कोणासमोरही याबाबतीत आपले मन मोकळे न करता नैराश्येतून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Kolhapur: बारावीत कमी मार्क मिळाल्याच्या नैराश्येतून विद्यार्थिनीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 15:40 IST