विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या
By Admin | Updated: December 29, 2014 00:10 IST2014-12-28T23:52:56+5:302014-12-29T00:10:34+5:30
प्रेमप्रकरणातून शक्यता : शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहातील घटना

विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक तीनमध्ये आज, रविवारी एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया कृष्णा पाटील (वय २४, रा. रिळे-बत्तीस शिराळा, जि. सांगली) असे तिचे नाव आहे. या प्रकाराची राजारामपुरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आत्महत्येच्या प्रकारामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : सुप्रिया विद्यापीठातील रसायनशास्त्र विद्याशाखेत ‘अप्लाईड केमिस्ट्री’ या विषयाच्या द्वितीय वर्षात शिकत होती. आज दुपारी वसतिगृहातील मेसमधून जेवून ती आपल्या ७५ क्रमांकाच्या खोलीमध्ये गेली. त्यानंतर तिची मैत्रीण वर्षा पाटील सायंकाळी सहा वाजता तिला भेटण्यासाठी आली. यावेळी खोलीचा दरवाजा बंद होता. तिने दरवाजा उघडण्यासाठी तिला हाक मारली; पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावर काही विद्यार्थिनी जमल्या. त्यांनी तिला पुन्हा हाक मारली; पण आतून काहीच आवाज न आल्याने याबाबत वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाला माहिती दिली.त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या माध्यमातून पोलिसांना बोलाविले. पोलिसांनी येऊन खोलीचा दरवाजा तोडला असता, सुप्रियाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. शांत व मनमिळावू स्वभावाच्या सुप्रियाने आत्महत्या केल्याचे समजताच वसतिगृह परिसरात विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गर्दी केली. वसतिगृहातील विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, आदी अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. वसतिगृहाबाहेर विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याने याठिकाणी पोलीस व विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मृत सुप्रिया हिच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.
मैत्रिणीला धक्का
गेल्या आठ दिवसांपासून सुप्रिया एकटीच रूममध्ये होती. तिच्या रूममधील इतर मैत्रिणी गावी गेल्या आहेत. आजच सकाळी मैत्रीण वर्षा पाटील ही आली होती. सुप्रियाने आत्महत्या केल्याचे समजताच मानसिक धक्का बसून ती बेशुद्ध पडली. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
तिसऱ्यांदा प्रकार
विद्यापीठात यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यात मुलांच्या वसतिगृहामध्ये एकाने विष पिऊन, तर आणखी एकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता; परंतु प्रशासन व इतर विद्यार्थ्यांच्या जागरूकतेमुळे त्यांचे प्राण वाचले; पण मुलींच्या वसतिगृहातील ही पहिलीच घटना आहे. (प्रतिनिधी)