विद्यार्थी मंडळ निवडणुकीला गालबोट
By Admin | Updated: August 15, 2014 00:23 IST2014-08-14T23:58:14+5:302014-08-15T00:23:32+5:30
शिवाजी विद्यापीठ : अधिकाऱ्यांना धारेवर; निवडणूक रद्दची मागणी

विद्यार्थी मंडळ निवडणुकीला गालबोट
कोल्हापूर : मतदारयादीनुसार अर्जात नावाची नोंद न केल्याने अर्ज बाद केल्याबद्दल तसेच मतदारांना आवाहन करताना विद्यार्थी संघटनेचा, त्यांच्या पदधिकाऱ्यांचा उल्लेख केल्याच्या कारणावरून अपमान केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी विद्यार्थी सेना आणि आॅल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनच्या (एआयवायएफ) कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना आज, गुरुवारी धारेवर धरले.
शिवाजी विद्यापीठ अधिविभाग विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीनंतर तब्बल दोन तास संबंधित कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांत वाद रंगला. ही निवडणूक रद्द करून पुन्हा घ्यावी, अशी लेखी मागणी या संघटनांनी विद्यापीठाकडे केली.
निवडणुकीत सचिवपदासाठी दाखल झालेल्या पाच अर्जापैकी दोन अर्ज अवैध ठरले. त्यात प्रियांका जाधवने तिला दिलेल्या मतदार यादीनुसार अर्जात स्वत:चे नाव नोंद करताना ‘श्रीमती’ असा उल्लेख केल्याबद्दल अर्ज अवैध ठरला. तसेच निवडणूक लढविलेल्या अश्विनी नाईकने मतदारांना आवाहन करताना संघटनेचा, पदधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख केल्यावर कल्याण मंडळाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांनी तिला मध्येच थांबविले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ‘एआयवायएफ’चे गिरीष फोंडे, अश्विनी नाईक, शिवाजी माळी यांनी, तर प्रियांका जाधवचा अर्ज जाणीवपूर्वक बाद केल्याचा आरोप केला. ‘राष्ट्रवादी विद्यार्थी’चे शहराध्यक्ष अवधूत अपराध, प्रियांका जाधव, सानिक मुतालिक आदींनी कुलगुरूंकडे तक्रारीसाठी धाव घेतली. कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेर डॉ. गायकवाड आणि विद्यार्थी संघटनांमध्ये वाद झाला. त्यानंतर प्रभारी कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या कक्षात सर्वांचा वाद दोन तास सुरू होता. यावेळी निवडणूक रद्दची मागणी केली. शिंदे यांनी मागणी कुलगुरूंपुढे ठेवण्यात येईल, असे सांगितल्यावर वाद थांबला. (प्रतिनिधी)