बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यास अटक

By Admin | Updated: December 11, 2014 00:32 IST2014-12-11T00:25:48+5:302014-12-11T00:32:32+5:30

साळोखेनगरमधील घटना : २६ हजार किमतीचे ४९ गॅस सिलिंडर जप्त

Stuck in illegal gas filling | बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यास अटक

बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यास अटक

कोल्हापूर : साळोखेनगर-भारतनगर येथील ओढ्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्या तरुणास आज, बुधवारी दुपारी राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून अटक केली. संशयित आरोपी यल्लाप्पा सत्याप्पा कोळी (वय २७, रा. साळोखे पार्क ) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून २६ हजार किमतीच्या ४९ गॅस सिलिंडर टाक्या, वजन काटा, इलेक्ट्रिक मोटार, आदी मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, साळोखे पार्कमध्ये यल्लाप्पा कोळी हा लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, अशाप्रकारे बेकायदेशीरपणे घरगुती वापराचा गॅस वाहनांमध्ये इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने भरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे राजू वरक, दत्तात्रय माळवी, मिलिंद नलवडे, अरुण खोत, गौरव चौगुले, आदींनी त्या ठिकाणी छापा टाकला असता कोळी हा गॅस भरून वाहनधारकांना देत असताना रंगेहात मिळून आला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राजेंद्रनगरमध्ये बेकायदेशीर गॅस भरणाऱ्या गणेश मस्के व सागर कांबळे या दोघांना दहशतवादी विरोधी पथकाने छापा टाकून अटक केली होती.
यामुळे राजेंद्रनगर व साळोखे पार्क परिसरात मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Stuck in illegal gas filling