विलीनीकरणामुळे अडकला पी. एम. किसानचा हप्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:28 IST2021-09-09T04:28:52+5:302021-09-09T04:28:52+5:30
म्हाकवेः बँकेच्या विलीनीकरणामुळे पी. एम. किसान योजनेतील हजारो शेतकऱ्यांचा नववा हप्ता मिळालेलाच नाही. विलीनीकरणामुळे बँक खाती अपटेड नसल्याच्या ...

विलीनीकरणामुळे अडकला पी. एम. किसानचा हप्ता
म्हाकवेः बँकेच्या विलीनीकरणामुळे पी. एम. किसान योजनेतील हजारो शेतकऱ्यांचा नववा हप्ता मिळालेलाच नाही. विलीनीकरणामुळे बँक खाती अपटेड नसल्याच्या कारणास्तव हा हप्ता अडकला आहे. याबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
मार्च महिन्यापूर्वी देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले. त्यामुळे सर्वच खातेदारांचे बँक खाते नंबर व आयएफएससी कोड नंबरही बदलला. तो अपडेट न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे हे पैसे वर्ग झालेले नाहीत. वास्तविक विलीनीकरणाची प्रक्रिया करतानाच बँकेने ही काळजी घ्यायला हवी होती. उलट, बँकेचे अधिकारी, तलाठी किंवा कृषी सहायक यांच्याकडून हे अपडेट करून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठी लागले आहेत. परंतु, तलाठी व कृषी सहायक यांनी या कामाला स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे बँकेनेच याबाबत पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
दरम्यान, गतवर्षभरात अनेक सहकारी बँका, सहकारी संस्थांचेही विलीनीकरण झाले आहे. त्यातील अनेक शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. विलीनीकरणापूर्वी असणाऱ्या कर्जापोटी दिलेले धनादेश दुसऱ्या बँकेकडून वर्ग केले जातात. मग, शेतकऱ्यांची खाती का अपडेट केली जात नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे.
सिद्धनेर्लीतील त्या आंदोलनाची दखल
बँक खाते अपडेट करण्याचा महसूल विभागाचा संबंध नसताना शेतकऱ्यांना महसूल विभागाकडे पाठवले जात होते. त्यामुळे गत आठवड्यात लाल बावटा संघटनेने सिद्धनेर्ली येथील बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे सिद्धनेर्लीसह जिल्ह्यातील देना बँकेतून विलीनीकरण झालेल्या शेतकऱ्यांची खाती अपडेट करण्याची जबाबदारी बँकेने घेतली.
कोट....
येत्या चार दिवसांत पी. एम. किसानसह विविध योजनांचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना मिळावा, अन्यथा पुढील आठवड्यात बँकांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू.
काॅ. शिवाजी मगदूम
जिल्हा सचिव, लाल बावटा
कोट....
बँक ऑफ बडोदामध्ये मर्ज झालेल्या देना बँकेतील खातेदारांचे खाते नंबर अपडेट करण्याचे काम सुरू आहे. याबाबत बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना पी. एम. किसानचा हप्ता लवकरच मिळेल.
मोहसिन शेख, क्षेत्रिय विकास प्रबंधक, बँक ऑफ बडोदा