सरकारची मदत मिळेपर्यंत संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:26 IST2021-07-30T04:26:46+5:302021-07-30T04:26:46+5:30

शिरोळ येथे पूरग्रस्तांशी साधला संवाद शिरोळ : महापूर येऊन आठ दिवस झाले तरी पूरग्रस्तांना अद्याप कुठलीच मदत मिळालेली नाही. ...

Struggle until government help | सरकारची मदत मिळेपर्यंत संघर्ष

सरकारची मदत मिळेपर्यंत संघर्ष

शिरोळ येथे पूरग्रस्तांशी साधला संवाद

शिरोळ : महापूर येऊन आठ दिवस झाले तरी पूरग्रस्तांना अद्याप कुठलीच मदत मिळालेली नाही. तातडीने मदत करण्याऐवजी सरकारकडून केवळ मदतीच्या रोज नव्या घोषणा होत आहेत,मात्र अंमलबजावणी नाही. सरकारविरुद्ध पूरग्रस्तांचा मोठा रोष असून जोपर्यंत सरकारकडून मदत मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष सुरू राहील, असा इशारा विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.

शिरोळ येथे श्री पदूमाराजे विद्यालयात गुरुवारी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यानंतर शिरोळ-नृसिंहवाडी रोडवरील पूरपरिस्थितीची पाहणी त्यांनी केली. यावेळी मुंबईचे आमदार तमिल सेल्वन यांच्याकडून आणलेली मदत पूरग्रस्तांना वाटप करण्यात आली. पूरग्रस्तांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे मोठे नुकसान झाले आहे. २०१९ च्या महापुरात आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतीची नुकसान भरपाई दिली होती. घरे बांधायला मदत तर घरे पडल्यामुळे बाहेर राहणाऱ्या पूरग्रस्तांना घरभाडे देखील दिले होते. मृत जनावरांची नुकसान भरपाई, छोटे दुकानदार यांना ५० हजार रुपये तर कुठलाही पंचनामा न करता तातडीने पाच हजारांचे सानुग्रह अनुदान रोखीने दिले होते. मात्र सध्याचा महापूर येऊन आठ दिवस झालेतरी अद्याप कुठलीच मदत या सरकारने केलेली नाही. २०१९ च्या महापुरावेळी जी मदत मिळाली ती आता का मिळत नाही. त्यामुळे सरकारबद्दल पूरग्रस्तांमध्ये मोठा रोष आहे. पूरग्रस्तांचे प्रश्न घेऊन आम्ही सरकारकडे जाणार आहोत. लोकांचे नुकसान झाले असताना कशासाठी पंचनामे?, त्यांना थेट मदत करावी, अशी आमची मागणी आहे.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, तमिल सेल्वन, माजी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, गुरुदत्तचे अध्यक्ष माधवराव घाटगे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सुरेश हाळवणकर, डॉ. अशोकराव माने, डॉ. संजय पाटील, हिंदूराव शेळके, पृथ्वीराज यादव, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ : शिरोळ येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, तमिल सेल्वन, धनंजय महाडिक, समरजित घाटगे, माधवराव घाटगे, प्रवीण दरेकर, सुरेश हाळवणकर, डॉ. अशोकराव माने, डॉ. संजय पाटील उपस्थित होते.

Web Title: Struggle until government help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.