संघर्षयात्री ते कार्यतत्पर मंत्री : नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:40 IST2021-05-05T04:40:34+5:302021-05-05T04:40:34+5:30

कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मागील दीड वर्षात केलेले काम प्रशंसनीय असे झाले ...

Struggle Minister to Acting Minister: Hon'ble Rajendra Patil-Yadravkar | संघर्षयात्री ते कार्यतत्पर मंत्री : नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

संघर्षयात्री ते कार्यतत्पर मंत्री : नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोरोना महामारीचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मागील दीड वर्षात केलेले काम प्रशंसनीय असे झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वत:ला लाभलेल्या पदाची प्रतिष्ठासुद्धा राजेंद्र पाटील यांनी उंचावली आहे. संघर्ष आणि संकटाच्या काळात परिस्थिती कशी हाताळायची याचे कसब त्यांच्या अंगी असल्याने त्यांनी मंत्री म्हणून दमदारपणे वाटचाल सुरू ठेवली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणातील एक प्रथितयश नाव म्हणून सहकारमहर्षी स्वर्गीय शामरावअण्णा पाटील-यड्रावकर यांची ओळख होती. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपल्या वडिलांकडून मुत्सद्दीपणाचे आणि संकटाशी दोन हात करण्याचे धडे घेतले. त्यांनी संघर्ष, संकटे खूप जवळून अनुभवली व पाहिली. त्यामुळेच शामराव पाटील-यड्रावकर यांच्यानंतर अगदी कमी वयात जबाबदारीचे ओझे पडलेल्या या नेतृत्वाने कठीण काळातसुद्धा जुन्या- नव्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन अतिशय शांत आणि संयमी वृत्तीने परिस्थिती हाताळली. आपल्या वाट्याला आलेल्या संघर्ष व संकटावर अनुभवाच्या बळावर लीलया मात केली आणि बाप से बेटा सवाई म्हणत सहकारमहर्षी स्वर्गीय शामराव पाटील-यड्रावकर यांची अपुरी राहिलेली सर्व स्वप्ने वयाच्या पन्नाशीत पूर्ण केली. परिस्थितीची जाणीव, व्यवसायातील सचोटीपणा, सहकारातील प्रश्नांची जाण, समोरच्याचे ऐकून घेण्याची वृत्ती, वडीलधारी व मार्गदर्शक मंडळींचा आदर, कुटुंबासह कार्यकर्त्यावर जिवापाड प्रेम करण्याची पद्धत, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याची सवय, चिकित्सकपणा, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे काम करीत त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न, सुख-दु:खात धावून जाण्याची वृत्ती, सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करण्याची पद्धत आणि सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची चाड, एवढ्या सद्गुणांची स्वत:कडे शिदोरी असलेल्या या नेतृत्वाने प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार, समाजकारण आणि राजकारणात राजेंद्र पाटील-यड्रावकर ही स्वत:ची ओळख स्व-कर्तृत्वावर निर्माण केली.

मोठ्या मताधिक्याने शिरोळ विधानसभेची जागा जिंकत महाराष्ट्र शासनाच्या पाच वेगवेगळ्या खात्यांचा कार्यभार स्वीकारून राज्यमंत्रीपद स्वीकारल्यापासून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मागील वर्ष-दीड वर्षाच्या काळात आमदार किंवा मंत्रीपदाचा कोणताच अनुभव नसताना संकटाला कसे सामोरे जायचे, या अनुभवाच्या शिदोरीवर आरोग्य राज्यमंत्री म्हणून दमदार कामगिरी करत आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी आपल्या कार्यातून ते समर्थपणे पार पाडीत आहेत. त्याचबरोबर आपल्याला मिळालेल्या मंत्रीपदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी महाराष्ट्रासमोर आलेल्या या संकटाच्या काळात ते रात्रंदिवस काम करीत आहेत. शासकीय रुग्णालयांना वारंवार भेटी देणे. त्या ठिकाणच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेणे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत तातडीने अधिकाऱ्यांना सूचना देणे, उपचार घेणाऱ्या रुग्णांबाबत आस्थेवाईकपणे चौकशी करणे, रुग्णांच्या नातेवाइकांना धीर आणि आधार देणे, त्याचबरोबर शासनाच्या वतीने सुरू केलेल्या कोविड सेंटरना भेट देऊन तिथल्या अडीअडचणी जाणून घेणे, अशा प्रकारे कामाचा सपाटा त्यांनी सुरू ठेवलेला आहे. एकूणच नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपल्या अंगी असलेल्या सार्वजनिक, राजकीय व सामाजिक जीवनातील अनुभवाच्या बळावर सर्वमान्य व लोकमान्य नेतृत्व, अशी ओळख निर्माण करत आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. मंत्री म्हणून काम करत असताना राजेंद्र पाटील-यड्रावकर या नेतृत्वाने मंत्रीपदाची हवा कधी डोक्यात जाऊ दिली नाही. सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगत अफाट कष्ट करण्याच्या आपल्या वृत्तीमुळे या नेतृत्वाने आपले पाय जमिनीवर ठेवले आहेत.

मतदारसंघातील प्रश्न असोत, जिल्हा व राज्यपातळीवरील समस्या असोत, या सर्व गोष्टींचा शांतपणे आणि सखोल अभ्यास करायचा आणि या प्रश्नांचे निराकरण कसे करता येईल किंवा तो सोडवता कसे येतील, यासाठी प्रयत्न करायचे.

त्यांच्या या वृत्तीमुळे जनमानस अथवा प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर या व्यक्तिमत्त्वाविषयी मोठा आदर निर्माण होताना दिसत आहे. राज्यासमोर आर्थिक संकट असतानादेखील आमदारकी आणि मंत्रीपदाच्या आपल्या पहिल्याच वर्षात शिरोळ या आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी १०९ कोटी रुपयांचा निधी आणण्याची किमया त्यांनी केली आहे. नंतरच्या काळात म्हणजे यावर्षी मार्च २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आजअखेर जवळपास ६५ ते ७० कोटी रुपयांचा निधी राज्यमंत्री यड्रावकर यांच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी प्राप्त होत आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघात एवढे भरीव काम आणि एवढा मोठा निधी पहिल्यांदाच मिळत आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, स्वर्गीय खासदार बाळासाहेब माने, सहकारमहर्षी शामराव पाटील-यड्रावकर, दलितमित्र दिनकरराव यादव, माजी आमदार अप्पासाहेब ऊर्फ सा.रे. पाटील यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जात असलेले राजेंद्र पाटील-यड्रावकररूपी हे नेतृत्व कमी वयात आणि कमी काळात बहरत आहे. शिरोळ तालुक्याने कधीकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे नेतृत्व केले होते. तो सुवर्णकाळ पुन्हा यायचा असेल, तर राजकारणातील मतभिन्नता बाजूला ठेवून केवळ विरोधासाठी विरोध न करता कार्यक्षमता आणि उमेद पाहून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शिरोळच्या जनतेने सर्वमान्य व लोकमान्य नेतृत्व म्हणून स्वीकारलेच आहे, आता ते सर्वांनी स्वीकारावे, असे वाटते. परमेश्वराने तशी बुद्धी सर्वांना द्यावी आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीसुद्धा त्यांच्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन शिरोळ तालुक्याचे हरवलेले गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी जोमाने काम करावे. कोरोनाची महामारी कमी होऊन सामान्य माणसाचे जीवन सुखी आणि निर्मळ व्हावे, या अपेक्षांसह या कार्यतत्पर नेतृत्वाच्या दमदार वाटचालीस त्यांच्या वाढदिनी आभाळभर शुभेच्छा...

.........

-बबन यादव, माजी सरपंच चिपरी

Web Title: Struggle Minister to Acting Minister: Hon'ble Rajendra Patil-Yadravkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.