लाल बावटा संघटनेच्या संघर्षामुळेच कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:29 IST2021-08-20T04:29:27+5:302021-08-20T04:29:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सरुड : लाल बावटा संघटनेने अनेक वर्षे शासनाशी केलेल्या संघर्षामुळे श्रम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या श्रमाला ...

लाल बावटा संघटनेच्या संघर्षामुळेच कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा
लोकमत न्यूज नेटवर्क
सरुड : लाल बावटा संघटनेने अनेक वर्षे शासनाशी केलेल्या संघर्षामुळे श्रम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या श्रमाला खरी प्रतिष्ठा व त्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे, असे प्रतिपादन लाल बावटा कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड भगवानराव घोरपडे यांनी केले .
सरूड (ता.शाहूवाडी) येथे तालुक्यातील बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक लाल बावटा संघटनेचे जिल्हा सदस्य पंचम सुतार यांनी केले.
घोरपडे म्हणाले २९ योजना स्मार्ट कार्डच्या माध्यमातून कामगारांना मिळतात. इमारत व इतर बांधकाम यांच्या व्याख्येत २१ विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे. कामगारांनी जागरूक राहून विविध योजनांचा लाभ घ्यावा. लाल बावटा संघटना नेहमी कामगारांच्या न्याय हक्कांसाठी झटत असून संघटना नेहमी कामगारांच्या पाठीशी राहील.
यावेळी कामगारांना बांधकाम कामगार नोंदणी व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते नूतनीकरण व दोनशे कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास लेबर ऑफिसर गोरखनाथ थोरवत, नितीन घोरपडे, आनंदा मगदूम, दिलीप माने, प्रकाश साठे, पांडुरंग शेळके, आदींसह बहुसंख्य महिला व पुरुष कामगार तसेच लाल बावटा संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.