अपेक्षापूर्तीसाठी सचोटीने प्रयत्न
By Admin | Updated: February 26, 2015 00:47 IST2015-02-26T00:35:53+5:302015-02-26T00:47:22+5:30
एन. जे. पवार : नॅक ‘अ’ मानांकन ही पोचपावती

अपेक्षापूर्तीसाठी सचोटीने प्रयत्न
कोल्हापूर : पहिल्यांदा संवाद, मग चर्चा व गरज पडली, तर मुत्सद्दीपणाचा वापर या त्रिसूत्रीने शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून कारकीर्द पूर्ण केली. विद्यापीठाशी संबंधित प्रत्येक घटकाच्या अपेक्षापूर्तीसाठी सचोटीने व प्रामाणिकपणे प्रयत्न केला. विद्यापीठातील निखळ शैक्षणिक वातावरण, ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन ही माझ्या कामाची पोचपावती मानतो. सूडबुद्धी टाळून संयमाने काम केल्यानेच प्रत्येक टप्प्यावर यशस्वी ठरल्याचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी बुधवारी येथे सांगितले.
डॉ. पवार यांची कुलगुरूपदाची मुदत बुधवारी संपली. त्यानिमित्त त्यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, कुलगुरुपदी निवड झाल्यानंतर अनेकांनी विद्यापीठाबाबत भीती घातली. येथील संघटना भक्कम असून त्यांच्यासमवेत काम करणे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. पण त्यावर डगमगून गेलो नाही. या विद्यापीठातील वातावरण बदलण्याच्या निर्धाराने काम सुरू केले. पहिल्या सहा महिन्यांत अधिकारी, सेवकांची रिक्त पदे भरून प्रशासकीय व्यवस्था भक्कम व शिस्तबद्ध केली. व्यवस्थापन, कामात गडबड होण्यापूर्वी संबंधित घटकांशी संवाद साधल्याने त्यांनी सहकार्य केले. त्यामुळे मार्ग सुकर झाले. (प्रतिनिधी)
सकारात्मक भूमिकेने चांगले काम करता आले
कुलगुरू म्हणून काम करण्याची पहिलीच वेळ होती. माध्यमांनी विद्यापीठातील चुका दाखवून चांगल्याचे कौतुक केले. त्यांच्या अधिकतर सकारात्मक भूमिकेमुळे मला चांगले काम करता आले. शिवाय बळ मिळाल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
चटके बसल्याने शिकलो
मला १९७२ च्या दुष्काळाचे चटके बसल्याने शिक्षणात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुलगुरुपदापर्यंत पोहोचलो. दुष्काळाची जाणीव असल्याने या भागाशी कायम संवाद ठेवतो. आटपाडी, खानापूरसाठी गतवर्षी ‘एनएसएस’च्या माध्यमातून ‘एक पेंढी’ अभियान राबविले. त्याला विद्यापीठाच्या घटकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ती कायमची आठवण असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.