केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-25T01:14:35+5:302015-07-25T01:14:35+5:30

शेतकऱ्यांचा अवमान : इचलकरंजी काँग्रेसच्यावतीने निदर्शने

Strong protests against the statement of Union Agriculture Minister | केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचा जोरदार निषेध

इचलकरंजी : प्रेम प्रकरणातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी केल्यामुळे राज्यातील तमाम शेतकऱ्यांचा अवमान झाला आहे. दुष्काळ आणि कर्ज अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी भाजपचे सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, अशी टीका माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.
राज्यसभेतील एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कौटुंबिक वाद, प्रेम प्रकरणे, व्यसनाधीनता यातून होत असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या अवमान करणाऱ्या त्यांच्या वक्तव्याबद्दल येथील शहर कॉँग्रेस समितीच्यावतीने जनता चौकामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कृषिमंत्र्यांच्या नावाने शंखध्वनी करीत जोरदार निदर्शने झाली. आंदोलनामध्ये शेतकरी बैलगाडी आणि वैरण घेऊन जाणारा शेतकरी सहभागी झाले होते.
या आंदोलनामध्ये शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, उपाध्यक्ष विलास गाताडे, राहुल खंजिरे, संपत जामदार, शिवाजी काळे, इलाई कलावंत, नंदू पाटील, आर.के.पाटील, राजू बोंद्रे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, अमृत भोसले, समीर शिरगावे, बाळासाहेब माने, शेखर हळदकर, आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

राज्यसभेत अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रेम प्रकरणातून, दारूच्या व्यसनातून, कौटुंबिक वादातून होत असल्याचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही. त्यांनी केलेल्या विधानाचा आम्ही धिक्कार करीत आहोत. याचबरोबर या आत्महत्या आज शेतीला भाव मिळत नाही. याचबरोबर कर्जप्रकरण, नैसर्गिक आपत्ती, गारपीट, दुष्काळ यांतून होत आहेत. याचबरोबर एक हजार आत्महत्येच्या प्रकरणांत एखाद्या शेतकऱ्याची प्रेमप्रकरणातूनही आत्महत्या होऊ शकते. मात्र, सरसकट सर्वांच्या आत्महत्या या प्रेमप्रकरण, व्यसनांतून होत असल्याचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही.
- खासदार राजू शेट्टी
3

पाऊस नाही, पिके धोक्यात आली आहेत. साखरेचे दर खाली आले आहेत. अशा कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी सापडला आहे. अशा परिस्थितीत प्रेम आणि व्यसनाधीनतेमुळे शेतकरी आत्महत्या करतात, असे विधान करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. भाजपच्या मंत्रिमंडळात राधामोहनसिंह यांच्यासारखे असे अनेक मंत्री आहेत, ज्यांना शेतकरी, गरीब जनता आणि मागासवर्गीय यांच्या प्रश्नांबाबत काहीही देणे-घेणे नाही. पंतप्रधान मोदीही याला अपवाद नाहीत. वादग्रस्त विधाने करून देशामध्ये अराजक माजविण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे.
- पी. एन. पाटील - माजी आमदार


भाजपच्या नेत्यांची डोकी फिरलीत की काय, अशी शंका या नेत्यांच्या विधानावरून येते. हजारो शेतकऱ्यांच्या व शहरातील लोकांच्या मतांच्या जोरावर निवडून आलेल्या भाजप सरकारला शेतकऱ्यांबद्दल असूया आहे. त्यामुळेच ते असे बेताल वक्तव्य करीत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी त्यांना देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांबद्दल अशी विधाने करणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांचा तीव्र निषेध केला पाहिजे. राधामोहन सिंह यांनी राजीनामा द्यावा. - आमदार हसन मुश्रीफ


केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी आपल्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकण्यासाठी शेतकरी प्रेमप्रकरण, दारूचे व्यसन, कौटुंबिक वाद यांतून आत्महत्या करीत असल्याचा जावईशोध लावला आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आणि अडचणींचा विसर पडला आहे. राज्यसभेत अशी चुकीची उत्तरे देऊन त्यांनी कमालच केली आहे. सरकार आणि त्यात काम करणारे असे मंत्री आपल्या अकार्यक्षमतेवर पडदा टाकण्यासाठी अशी कमाल करणारी वक्तव्ये करीत आहेत. एकूणच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनाहीन झालेय.
- रघुनाथदादा पाटील

५शेतकऱ्याला सध्याची शेती कसणे विविध कारणांमुळे अशक्य आहे. त्यात भर म्हणजे निसर्गाची अवकृपा. या सर्वांचा परिणाम कर्जबाजारीपणा, कौटुंबिक व सामाजिक पातळीवरील मानहानी, भविष्याबद्दलच्या प्रचंड तणावामुळे शेतकरी आत्महत्या करतात हे वास्तव आहे. अशा स्थितीत कौटुंबिक वाद, प्रेमप्रकरण ही कारणे सांगणे कल्पनारंजित वाटते. - प्रा. डॉ. जे. एफ. पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ


शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या जिव्हाळ्याच्या आणि जीवन-मरणाच्या प्रश्नावर अशा स्वरूपातील केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भूमिका आणि त्यांचे आकलन त्यांना लखलाभ असो. अशा पद्धतीचे बालिश आकलन असणाऱ्यांवर मी फारसे भाष्य करू इच्छित नाही.
- प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत

Web Title: Strong protests against the statement of Union Agriculture Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.